

नाशिक: एकनाथ खडसे यांनी एका व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबध असल्याचा खळबळजनक दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. त्या महिला अधिकाऱ्याचे नाव देखील आपल्याला माहिती असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. परंतु खडसे यांच्या आरोपांचा इन्कार करताना आपण जर त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली तर त्यांना घराबाहेर पडणे देखील मुश्कील होईल, असे प्रत्युत्तर दिले आहे. खडसे-महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे उत्तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
एकनाथ खडसे यांनी महाजनांसदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना भेटून यासदंर्भात आपण विचारणा करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर गिरीश महाजन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली त्याची माहिती असल्याचा दावा केला आहे. ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी महाजन यांना बोलवून घेतले होते. अमित शाह यांनी महाजन यांना एका महिला आयएस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधांबाबत थेट विचारणा करताच महाजन यांनी माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांसोबत बोलले सुरू असते. पण, शाहांनी तुमचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, असा सवालही शहांनी महाजनांना केला होता, असा दावा खडसे यांनी केला.
महाजन यांची दहा वर्षाची माहिती तपासली तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. आपण अमित शाहांना भेटणार आहे आणि आपली भेट झाली तर राज्यात हे जे चाललं आहे ते काय आहे", असा प्रश्न त्यांना विचारणार असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
खडसे यांनी केलेले आरोप फेटाळताना महाजन म्हणाले की, कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. मी जर त्यांची प्रकरणे बाहेर काढली तर त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल. ते नेहमी म्हणतात पुरावे आहेत सीडी आहेत. मी वारंवार त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा. त्यांचे जावई तीन वर्ष जेलमध्ये जाऊन आले होते. ते ज्येष्ठ आहेत वयाने मोठे आहेत. त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांची दिशाभूल करतात. मी त्यांच्या प्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मी सात वेळा आमदार आहे मंत्री आहे त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर त्यांना चेहरा दाखवता येणार नाही, अशा शब्दांत महाजन यांनी पलटवार केला.