

नाशिक : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत २२ फेब्रुवारीस प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेद्वारे सहावीत २ हजार २२० नवीन तर सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेसाठी २०२५-२६ मध्ये पाचवी व आठवीत प्रवेशित अनुसूचित, आदिम जमातीचे विद्यार्थी पात्र असतील. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीमार्फत सीबीएसई बोर्डाच्या ३७ एकलव्य निवासी शाळा चालवल्या जातात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे.
प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता आहे. या जागांवर प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती करण्यात येणार आहे. सोमवारपासून (दि.१५) अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. अपर आयुक्त कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल येथे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह त्याच कार्यालयात अथवा शाळेत जमा करावेत.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्वपरीक्षेला बसून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची निवड पूर्वपरीक्षेद्वारे होणार आहे.
लीना बनसोड, सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी
विभागनिहाय उपलब्ध जागा
नाशिक - ११९२
नागपूर - ९२३
ठाणे - ५८३
अमरावती - ३९५