

जुने नाशिक (नाशिक) : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त संपूर्ण नाशिक शहर वधूसारखे सजले आहे. शुक्रवारी (दि.४) दुपारी २ वाजता ईद-ए-मिलादची पारंपरिक मिरवणूक शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दिन खतीब यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.
मिरवणुकीसाठी शहरातील जुने नाशिकसह मुस्लिम बहुल भागात ठिकठिकाणी सजावट करण्यात आली आहे. दुकाने, घरे, मशिदी आणि बाजारपेठा मुहम्मद पैगंबरांच्या जीवनकार्यावरील प्रवचन व 'गुम्बद-ए-खिजरा'च्या देखाव्यांनी उजळून निघाल्या आहेत. धार्मिक बॅनर, फुल आणि रोषणाई विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. मुस्लीम बहुल भागात उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “आजवर नाशिकमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त अशी भव्य सजावट कधीच पाहिली नव्हती.” ईद-ए-मिलादची मिरवणूक जहांगीर मशिद चौक, चौक मंडई, बागवानपूरा, कथडा, मीरा दातार चौक, काझीपुरा, कोकणी पुरा., खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, हूसैनी चौक या मार्गाने पुढे जात मोठ्या दर्गा शरीफ येथे समारोपाला पोहोचणार आहे.
पोलिसांचा कडेकोड बंदाेबस्त : गणेशोत्सव विसर्जनासाठीचीही तयारी पूर्ण
'ईद-ए-मिलाद'निमित्त शुक्रवारी (दि.५) जुलूस काढण्यात येणार असून, त्यासाठी पोलिसांकडून प्रभावी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय प्रथमच जुलूस मार्गावर सीसीटीव्हीसह 'एआय'च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी ईद-ए-मिलाद जुलूसनंतर लगेचच शनिवारी (दि.६) गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे. या दोन्ही उत्सवासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलिस आयुक्त, ४७ निरीक्षक, १३० सहाय्यक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक, ३७ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, २२०० पुरुष अंमलदार, ४०० महिला अंमलदार, ११०० पुरुष होमगार्ड, २५० महिला होमगार्ड, १३ ट्राइक फोर्स, दोन आरसीपी, एसआरपीएफची एक कंपनी, बीडीसीएसचे दोन स्कॉड असा प्रभावी बंदोबस्त तैनात असणार आहे. ईद-ए-मिलादच्या जुलूसनिमित्त असलेला बंदोबस्त गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठीही कायम असणार आहे. या दोन्ही मिरवणुकीत प्रथमच पोलिसांकडून एआयचा वापर केला जाणार आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, यंदा ८८४ सार्वजनिक गणेश मंडळे तसेच एक लाख ४३ हजार ८०६ घरगुती गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.