

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभर गाजत असलेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या ठाणे तपासात पोलिस पथकाने जळगाव जिल्ह्यातील संशयिताला ताब्यात घेतले. सतीश दिलीप चौधरी (३५, रा. गौतमनगर, ता. चोपडा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो तस्करी प्रकरणात सहभागी दाम्पत्यांना बनावट आधारकार्ड तयार करून देत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने निवडक पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. स्त्री बीज तस्करीसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती आपली खरी ओळख उघड करणे टाळतात. याच पार्श्वभूमीवर दिलीप चौधरी हा अवघ्या १०० रुपयांत बनावट आधारकार्ड तयार करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
या बोगस कागदपत्रांच्या आधारे तस्करीच्या जाळ्यातील लोक आपली ओळख लपवित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरील मालती आयव्हीएफ सेंटरवरही ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता.
या सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, सरोगेट मदर प्रकरणात डॉ. पाटील एजंट म्हणून कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर नाशिक महापालिकेकडून संबंधित आयव्हीएफ सेंटर सील करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून बीज घेऊन अपत्यप्राप्ती न झालेल्या कुटुंबांना देश विदेशात मोठ्या पैशांत पुरवठा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात एका महिलेला नेऊन तिची बीजे काढण्याचा व्यवहार सुरू असल्याची माहिती स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे हे रॅकेट चालविले जात असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात संबंधित आयव्हीएफ व सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ठाणे पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.