

नाशिक : अकरावीसाठी राज्यात पहिल्यादांच राबवण्यात आलेल्या केंद्रिय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा विशेष फेरी आयोजित करण्यात आली असून प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थी आता २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत.
शैक्षणिक सत्र २०२५-२६ या वर्षाकरीता अकरावी प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण राज्यात १४ लाख ८५ हजार ६८६ पैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दोन्ही भाग भरले. त्यापैकी १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले. यानंतरही अद्याप काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने विशेष फेऱ्या राबवल्या नंतर पुन्हा एकदा विशेष फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी २५ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. विद्यार्थी दि. २२ ते २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊन अंतिम संधीचा लाभ घेऊ शकणार आहेत. या विशेष फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
अकरावी प्रवेशापासून एकही विदार्थी वंचित राहू नये या करता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा विशेष फेरीचे नियोजन केले आहे. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या फेरीचा लाभ घेऊन प्रवेश निश्चित करावेत.
संजय राठोड, शिक्षण उपसंचालक, नाशिक.