

नांदगाव (नाशिक) : तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या १३३ पदे रिक्त असून, त्यामुळे शिक्षकांसह शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. गट शिक्षणाधिकारी, शाळा पोषण आहार अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक तसेच लिपिक आदी पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
राज्य शासनाच्या 'पवित्र पोर्टल' माध्यमातून मागील वर्षी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त झाले किंवा बदलीने इतर ठिकाणी गेले. त्यामुळे रिक्त जागांचा अनुशेष कायमच राहिला आहे.
तालुक्यात एकूण 208 जिल्हा परिषद शाळा असून, येथे 17,185 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक शाळांमध्ये एका शिक्षकावर दोन वर्गांचा भार येत आहे. केंद्रप्रमुखांच्या जागाही अपुऱ्या असल्याने काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर केंद्रप्रमुखाची जबाबदारीही देण्यात आलेली आहे. या ठिकाणी शिक्षकांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी, अशी जोरदार मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
जिल्हा परिषद शाळा : 208
एकूण विद्यार्थी संख्या (पटसंख्या) : 17,185
रिक्त जागांमुळे काम करण्यास अडचणी येतात. ग्रामस्थांच्या तक्रारींना तोंड द्यावे लागते. या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात म्हणजे अधिक गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता येईल.
प्रमोद चिंचोले, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, नांदगाव, नाशिक.
आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा आम्ही डिजिटल केली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे परंतु आमच्या शाळेला मुख्याध्यापक आणि शिक्षकाची जागा गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनाचे धडे देताना शिक्षकांची दमछाक होते.
राजाभाऊ पवार, सरपंच, नागापूर