

नाशिक : दैनंदिन जीवनात सवयीने वापरल्या जाणार्या प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय देण्यासाठी विमल वसमतकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला. घरातील जुन्या साड्या, शर्ट, पॅण्ट यांचा पुनर्वापर करून त्यांनी कापडी पिशव्या तयार केल्या आणि मोफत वाटप सुरू केले. गेल्या 10 वर्षांत 16 हजारांहून अधिक पिशव्या वाटून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी वसमतकर यांचा हा छोटासा प्रयत्न आज एक प्रभावी आंदोलन ठरत आहे.
‘प्लास्टिक वापरू नका’ असे सांगणारे अनेक जण भेटतात, मात्र स्व:कृतीतून उदाहरण घालून देणारे फारच थोडे. अशाच प्रेरणादायी व्यक्तींपैकी एक म्हणजे विमल वसतमतकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिकमुक्त भारताबाबतच्या आवाहनातून प्रेरणा घेत विमल आजींनी घरातील जुन्या साड्या, पडदे, खण तसेच शिवायला फारसे फायदेशीर नसलेले पॅण्ट-शर्टचे कापड यांच्यापासून कापडी पिशव्या शिवण्याच्या उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’ केला.
विवाह, हळदी कुंकू कार्यक्रम, डोहाळ जेवण अशा कौटुंबिक तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये शिवलेल्या कापडी पिशव्या मोफत वाटून एक चळवळ उभी करणार्या विमल आजी सध्या वयोमानामुळे फारशा पिशव्या शिवू शकत नाहीत, तरीही त्यांनी वसा सोडला नाही. त्यांच्या या उपक्रमात सून शर्मिला वसतमकर या सहाय्य करत आहेत. प्लास्टिकमुक्ती मोहिमेत वाटा उचलणार्या या सासू-सुनेचं सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ पिशव्या नाही, तर त्या धान्य व फळांच्या बियांपासून राख्याही तयार करतात आणि या राख्या दरवर्षी सरहद्दीवरील सैनिकांना पाठवतात.
प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने 2009 पासून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशव्या मुक्त दिन साजरा केला जातो. तेव्हापासून 3 जुलै हा दिवस पर्यावरण संरक्षण, सागरी जीवसृष्टी वाचवणे आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. जगभरातील लोक, समुदाय आणि सरकारांचा यात सक्रिय सहभाग वाढत आहे.
पर्यावरण जपायचे तर आपण काय करू शकतो हा विचार हवा. स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन पिशव्या निर्मिती सुरू केली. पूर्वी 70 ते 80 पिशव्या करत. आता वयोमानाने हे काम होत नाही. परंतु चळवळ सुरूच आहे. सूनबाई आता पिशव्या शिवतात. गोदाकाठी येणारे भक्त, पर्यटकांना तसेच अनेक कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रमात आम्ही मोफत पिशव्या वाटतो.
विमल वसमतकर-स्वामी, उपक्रम प्रवर्तक