Grapes Export Demand | अर्ली द्राक्ष १५० रुपये किलो ; रशिया, दुबई, युएईमध्ये मागणी

भाव असूनही उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत
Grapes Export Demand
चांदवड : तालुक्यात अर्ली द्राक्षांची विक्रीसाठी तोडणी करताना मजूर. (छाया : सुनील थोरे).
Published on
Updated on
चांदवड (जि. नाशिक) : सुनील थोरे

तालुक्यातील अर्ली द्राक्षांना परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे या द्राक्षाला प्रतिकिलोसाठी १३० ते १५० रुपये भाव मिळत आहे. गतवर्षाचा दुष्काळ अन‌् ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या फटक्यामुळे अर्ली द्राक्षांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने भाव असूनही शेतकऱ्यांना कमी फायदा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चांदवड तालुक्यातील हवामान अर्ली द्राक्ष बागांच्या उत्पादनासाठी पोषक आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी नोव्हेंबर अन‌् डिसेंबर महिन्यात अर्ली द्राक्ष बागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. सध्या अर्ली द्राक्षबागांचे उत्पादन चांगले आले असून बहुतेक बागांची विक्री सुरू आहे. राहूड, उसवाड, चांदवड, कोतवाल वस्ती, पन्हाळे, गणूर परिसरातील बहुतेक अर्ली द्राक्ष बागा खरेदीसाठी बाहेरून व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने आले आहेत. अर्ली द्राक्ष बागांना रशिया, दुबई, युएई मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने द्राक्षाला १३० ते १५० प्रतिकिलो रुपये दर मिळत आहे. दरम्यान, अर्ली द्राक्षाच्या उत्पादनावर गतवर्षाचा दुष्काळ अन‌् ऑक्टोंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी यामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर ५० ते ६० टक्के परिणाम झाला आहे. अर्ली द्राक्षाचे उत्पादन घटल्याने द्राक्षाला तेजी आली आहे.

अतिवृष्टीचा द्राक्षांना फटका

तालुक्यात १३ ते १९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका अर्ली द्राक्ष बागांना बसला आहे. या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे जवळपास ५० ते ६० टक्के उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहे. परिणामी, अर्ली द्राक्ष बागांचे बाजारभाव प्रतिकिलो मागे वधारल्याचे दिसून येत आहे.

विदेशात अधिक मागणी

नाशिक जिल्हयातील अर्ली द्राक्ष बागांना रशिया, दुबई व युएई देशात मोठी मागणी आहे. यामुळे अर्ली द्राक्ष बागांना १३० ते १५० रुपये प्रतिकिलो रुपये दर मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अर्ली द्राक्षांना चालूवर्षी किलोमागे २० ते ३० रुपये अधिक मिळत आहे.

दरवर्षी अर्ली द्राक्षांचे उत्पादन घेतो. मात्र चालूवर्षी अर्ली द्राक्ष बागांना दुष्काळी परिस्थिती अन‌् अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. परिणामस्वरूप द्राक्षाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली आहे. द्राक्षाच्या उत्पादनात घट झाल्याने भावात वाढ झाली आहे. यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटून देखील भावामुळे शेतकऱ्याच्या पदरात खर्च वजा जाता दोन पैसे मिळत आहे.

– प्रवीण कोतवाल, द्राक्ष उत्पादक, चांदवड.

चालूवर्षी एक एकरमध्ये अर्ली द्राक्ष बागेची लागवड केली होती. संपूर्ण वर्षभर द्राक्षांची काळजी घेतल्याने द्राक्ष चांगले आले होते. त्यामुळे संपूर्ण द्राक्ष बाग हा रशियामध्ये विक्री करण्यात आला. या द्राक्षांना प्रतिकिलो १४४ रुपये दर मिळाला. साधारणतः १२५ क्विंटल द्राक्षाचे उत्पादन झाले. यावर्षी द्राक्षांना बाजारभाव चांगले असल्याने खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे शिल्लक राहिले आहे.

-वाल्मीक पवार, द्राक्ष उत्पादक, राहूड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news