

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात ४४ आसनी क्षमतेच्या सात ई - शिवाई बसेस दाखल झाल्या आहेत. 12 मीटर लांबीच्या या बसेस नाशिक - बोरिवली मार्गावर सोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे.
महाराष्ट्राची लाइफलाइन असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरकतेची कास धरली आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध यांसारख्या बसेसचा समावेश ताफ्यात केला. या बसेसला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. त्यानंतर महामंडळाने शिवाई बस सुरू केली असून, पाठोपाठ आता ई - शिवाईदेखील रस्त्यावर उतरविली आहे. नाशिक - पुणे महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या या ई - शिवाई प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्र ई–वाहन धोरण २०२१ अंतर्गत नाशिक विभागाला नव्याने सात ई - बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात १२ मीटर रुंदीच्या या बसेसची प्रवासी क्षमता ४४ इतकी आहे. या बसेसमध्ये आरामदायी पुशबॅक आसनव्यवस्था देण्यात आली आहे. तसेच या बसेस वातानुकूलित असून, मोबाइल चार्जिंगसह सीसीटीव्ही, रीडिंग लाइट व फूट लाइटची सुविधाही पुरविण्यात आली आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या या बसेस बोरिवली मार्गावर चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व जलदगतीने होत आहे.
महामंडळाने नाशिक विभागाला यापूर्वी नऊ मीटरच्या एकूण २४ ई - बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. सध्या या बसेस कसारा आणि सप्तशृंगगड मार्गावर प्रवाशांना सेवा पुरवित आहे. नव्याने दाखल झालेल्या सात बसेसमुळे आता ९ मीटरच्या बसेसच्या फेऱ्या पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर व शिर्डी मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.