

नाशिक : अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 95 टक्के साड्यांचे वाटप पूर्ण झाले आहे, मात्र 1 जूननंतर ई- पॉस मशीनमध्ये तांत्रिक बदल होऊन अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साडी वाटपाचा पर्यायच दिसत नसल्यामुळे उर्वरित पाच टक्के साड्यांचे वाटप खोळंबले आहे. त्यामुळे अंत्योदय शिधापत्रिकाधारक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला शासनाकडून वर्षभरातून एकदा मोफत साड्यांचे वाटप करण्यात येते. यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे वाटप करण्यास सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात 1 लाख 76 हजार 924 अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 1 लाख 67 हजार 678 साड्यांचे वाटप जून अखेरीस पूर्ण झाले होते तर, 9 हजार 242 साड्यांचे वाटप अद्याप बाकी आहे. ई- पॉस मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बदलामुळे साडी वाटपाचा पर्यायच येत नसल्यामुळे अंत्योदय शिधापत्रिकाधारक व धान्य वितरण दुकानदार यांंच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. धाविअ मालेगाव विभागात सर्वाधिक 1,678 साड्यांचे वाटप बाकी आहे, तर येवला तालुक्यात सर्वात कमी 164 साड्यांचे वाटप बाकी आहे. पुरवठा विभगाकडूनही याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याचे सांगितले जात आहे.
बागलाण- 574
चांदवड- 654
देवळा- 194
दिंडोरी- 382
धाविअ मालेगाव- 1,678
धाविअ नाशिक- 454
इगतपुरी- 693
कळवण- 448
मालेगाव- 476
नांदगाव- 435
नाशिक- 298
निफाड- 651
पेठ- 644
सिन्नर- 222
सुरगाणा- 845
त्र्यंबकेश्वर- 234
येवला- 164
एकूण- 9,246
ई- पॉश मशीनमध्ये तांत्रिक बदल होत असतात, त्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. मात्र यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्यात येईल व ज्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साड्या अद्याप मिळू शकल्या नाहीत, त्यांनाही लवकरच साड्या सुरळीतपणे मिळतील.
कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)