

नाशिक : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात अपयश आलेल्या एकूण ७० रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
नोटीस बजावलेल्यांपैकी ४७ दुकानदारांनी मंगळवारी (दि. १५) पुरवठा विभागात हजेरी लावून आपली बाजू मांडली. उर्वरित २३ दुकानदार गैरहजर राहिल्याने त्यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. या सर्व ७० दुकानदारांना सोमवारी (दि. २१) पुन्हा सुनावणीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या विरोधात पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
शासनाने 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे 70 रेशनदुकानदारांनी ई-केवायसीबाबत कुठलेही पाऊल उचलले नसल्याने जिल्हा पुरवठा विभागाने या दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नोटीसला उत्तर देण्यासाठी हे रेशनदुकानदार मंगळवारी (दि.15) जिल्हा पुरवठा विभागात हजर होते. यावेळी पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी रेशनदुकानदारांची झाडाझडती घेत 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले. तत्पुर्वी 21 एप्रिलला हजर राहून आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
शासनाने डिजिटायझेशन धोरणाअंतर्गत शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. राज्यात सध्या ७३.३५ टक्के लाभार्थींनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित नागरिकांना ३० एप्रिलपूर्वी अंतिम मुदत देण्यात आली आहे. या आधी चार वेळा मुदतवाढ मिळाली होती. तरी सर्वांनी ई-केवायसी तत्काळ पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.