

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या द्वारका ते नाशिकरोडदरम्यानच्या दहापदरी रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) या प्रकल्पासाठी २२० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रियेलाही वेग आला असून, मे अखेरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
शुक्रवारी (दि. ८) दिल्ली येथे वाहतूक व दळणवळण मंत्रालयात महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत द्वारका ते दत्त मंदिर रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री या बैठकीस उपस्थित होत्या. मंत्रालयाच्या मंजुरीमुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला असून, द्वारका अंडरपाससह या संपूर्ण मार्गाच्या विकासाला गती मिळणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या रस्त्याचे दहा पदरीकरण करण्यात येत आहे. रुंदीकरणासोबतच मार्गावरील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण आणि रुंदीकरणाची कामेही हाती घेतली जाणार आहेत. वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून, काही ठिकाणी स्वतंत्र सर्व्हिस रोडचीही उभारणी केली जाणार आहे.
९५ टक्के जागा ताब्यात
द्वारका ते दत्त मंदिर चौक या सुमारे ६.४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ४५ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९५ टक्के जागा ताब्यात असून, उर्वरित ५ टक्के जागेचे टीडीआरद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे द्वारका ते नाशिकरोड मार्गावरील वाढती वाहतूक क्षमता सुधारण्यास मदत होणार असून, भविष्यातील शहर विस्तार आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.