

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी, दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांकडून बुकिंगचा धडाका बघावयास मिळत आहे. त्यातून वाहन बाजारात तेजीचे वातावरण असून, मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे मोठे आव्हान डिलर्ससमोर निर्माण झाले आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी शुभ मानली जात असल्याने अन् यंदा तुलनेत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने वाहन बाजारात तेजी निर्माण झाली आहे. नाशिकच्या वाहन बाजारातील उलाढाल कृषी क्षेत्रावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याने, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्रात काहीसे भरभराटीचे वातावरण आहे. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, सर्वच आघाडीच्या वाहन कंपन्यांनी अद्ययावत सोयी-सुविधा असलेली वाहने बाजारात आणली आहेत. चारचाकींमध्ये एसयूव्ही, तर दुचाकींमध्ये स्पोर्टस् बाइकला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, काही चारचाकींच्या मॉडेल्सला तीन महिन्यांपेक्षा अधिक वेटिंग असल्याने, या वाहनांची डिलिव्हरी देण्याचे मोठे आव्हान डिलर्ससमोर असल्याचे बघावयास मिळत आहे. बहुतांश ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर डिलिव्हरी मिळावी, या बेताने वाहनांची बुकिंग केली आहे. त्यामुळे मुहूर्तावर डिलिव्हरी कशी देणार? हा प्रश्न डिलर्ससमोर निर्माण झाला आहे.
एका आघाडीच्या कंपनीने जुन्याच मॉडेल्सच्या नव्याने सादर केलेल्या चारचाकीला तब्बल सहा महिन्यांची वेटिंग असल्याची बाब समोर येत आहे. नुकतीच ही कार लॉन्च झाली असून, तिचा स्पोर्टी लूक ग्राहकांना चांगलाच भावत आहे. सध्या या कारची बुकिंग जोरात आहे. मात्र, मुहूर्तावर डिलिव्हरी मिळणार काय? याबाबत डिलर्स साशंक आहेत.
दुचाकी बाजारात मोठी तेजी आहे. डिलर्सच्या मते, दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्हाभरात सुमारे तीन हजार दुचाकींचे बुकिंग झाले आहे. स्पोर्टी लूक बाइकला अधिक पसंती आहे. याशिवाय इलेक्ट्रिक बाइकलाही मोठी मागणी आहे. इलेक्ट्रिक मोपेड बाइक खरेदीकडे महिला तसेच पुरुष ग्राहकांचा कल असल्याचे डिलर्स सांगतात.