नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याला वाहन, बांधकाम आणि सराफ बाजारात तब्बल एक हजार कोटींहून अधिक उलाढाल झाल्याने व्यापारी वर्ग सुखावला आहे. यंदा वरुणराजाची कृपादृष्टी आणि कोरोनातून सावरलेल्या प्रत्येक क्षेत्रातील तेजीमुळे बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले. वाहन बाजारात तब्बल १५० कोटी, बांधकाम क्षेत्रात ५०० कोटी, सराफ बाजारात २५० कोटी, तर अन्य बाजारपेठेतून 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दसरा मुहूर्तावर कोणतीही वस्तू खरेदी शुभ मानली जात असल्याने, सोने-चांदी, सदनिका, वाहन खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. वास्तविक अनेक ग्राहकांनी नवरात्रोत्सव काळातच वाहन तसेच सदनिका बुक करून दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेणे आणि गृहप्रवेश करणे पसंत केले. त्यामुळे दिवसभर शोरूम आणि बांधकाम स्थळी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. दुसरीकडे सराफ बाजारात रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ये-जा सुरू होती. होम अप्लायन्सेस वस्तू खरेदीकडेही मोठा कल दिसून आला. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच अन्य गृहोपयोगी वस्तू खरेदी जोरात केली गेली. मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर खरेदीतूनही मोठी उलाढाल झाली. कपडा बाजारातही मोठी तेजी दिसून आली. पुढच्या काही दिवसांत दिवाळी असल्याने, अनेकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावरच कपडे खरेदी करणे पसंत केले. ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने व्यापारी वर्ग सुखावल्याचे दिसून आले.
चारचाकी - १००० (इलेक्ट्रॉनिक- ५०)
दुचाकी - ३००० (ईव्ही - ५००)
फ्लॅट / रो- हाउसेस - ६५०
वाहन बाजारात ईव्ही वाहनांची क्रेझ वाढल्याचेही दिसून आले. विक्रेत्यांच्या मते इंधनवरील वाहन विक्रीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक विक्री ईव्ही वाहनांची झाली. चारचाकींमध्ये ५० पेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक चारचाकी डिलिव्हरी देण्यात आली, तर तब्बल 500 ईव्ही दुचाकींची विक्री झाली. दुचाकींमध्ये ईव्हीचे अनेक पर्याय उपलब्ध असून, ते खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून आला.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मात्र, मुहूर्तावर सोने खरेदी शुभ माानले जात असल्याने, दरवाढीचा फारसा परिणाम दिसून आला नाही. शनिवारी २४ कॅरेटचा दर प्रतितोळा ७८ हजार ६०० रुपये इतका होता. २२ कॅरेट प्रति 10 ग्रॅमसाठी ७१ हजार १७० रुपये इतका नोंदविला गेला, तर चांदीचा दर प्रतिकिलो ९४ हजार रुपये इतका होता. मात्र, अशातही खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात.
दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध करून दिल्या होत्या. फ्लॅट बुकिंगवर सोन्याचे नाणे तसेच वाहन विक्रीवर आकर्षक गिफ्ट अशा स्वरूपाच्या ऑफर्स दिल्या गेल्या. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर्सचा माेठा लाभ ग्राहकांनी घेतला. सराफ व्यावसायिकांनी घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून दिली होती.
नाशिकचा वाहन बाजार शहराबरोबरच ग्रामीण भागावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने, ग्रामीण भागातील ग्राहक सुखावला आहे. परिणामी दसरा मुहूर्ताच्या खरेदीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, एक हजारांहून अधिक कारच्या डिलिव्हरी दिल्या गेल्या.
पंकेश चंद्रात्रे, व्यवस्थापक, टाटा मोटार्स, नाशिक.
बांधकाम क्षेत्राबद्दल केंद्र तसेच राज्य शासनाचे सकारात्मक धोरण घरे विक्रीसाठी फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नरेडको सभासदांच्या प्रकल्पांमधील 300हून अधिक सदनिकांचे बुकिंग झाले. अन्य व्यावसायिकांकडून 300 ते 350 सदनिका विकल्या गेल्या.
सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक.
मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, सराफ बाजारात दरवाढीचा फारसा परिणाम दिसून आला नाही. रात्री उशिरापर्यंत ग्राहकांकडून सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यामध्ये पारंपरिक ग्राहकांचा सर्वाधिक समावेश होता.
गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.