

नाशिक : मागील निवडणुकांचे निकाल काही पक्षांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारे ठरले आहेत. विशेषत: राज ठाकरेंच्या 'मनसे'साठी सध्याचा काळ आव्हानांचा असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पक्षाचा हालहवाला घेण्यासाठी आलेल्या राज यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता, अनेकांनी अंतर्गत गटबाजीवरून मनमोकळे केले. मात्र, एका पठ्ठ्याने थेट साहेबांच्या भूमिकेवरूनच स्पष्टता केल्याने साहेबही अवाक् झाले. हा पठ्या स्थापनेपासून पक्षात आहे.
कधीकाळी वैभवाच्या झोतावर असलेल्या मनसेला नंतरच्या काळात उतरती कळा लागल्याने, पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. 'अंतर्गत गटबाजी अन् बदलणारी भूमिका' या प्रमुख कारणांमुळे बडे नेते, पदाधिकारी सोडून गेलेच, शिवाय कार्यकर्तेही सैरभैर झाल्याने नेतृत्वासमोर पक्ष संघटनेचे मोठे आव्हान निर्माण झाले. गेल्या विधानसभा निवडणूकीत सपाटून पराभवाला सामोरे जावे लागल्याने पक्षाची मान्यता अन् पक्ष चिन्ह धोक्यात आले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षासाठी अखेरची संधी असेल, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांनी, नाशिकमध्ये मोट बांधण्याच्या हेतूने दौरा केला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी गटागटाला पुरेसा वेळ दिला. 'मनमोकळे बोला' अशीच साद घालून त्यांनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविला. कार्यकर्त्यांनीही स्थानिक स्तरावर असलेल्या पक्ष संघटनेतील उणिवा बोलून दाखविल्या. मात्र, यातील एका पठ्ठ्याने तर जास्तच स्पष्टपणे आपल्या भावना बोलून दाखविल्या.
पठ्ठ्याने राज साहेबांनाच सल्ला देत, 'तुम्ही भाजपच्या लोकांना कृष्णकुंजवर बोलावत जावू नका. कारण ते तुम्हाला भेटून गेल्यानंतर लोक 'मॅनेज पक्ष' म्हणून आपल्यावर टीका करतात.' त्यावर राज साहेबांनी, 'मी त्यांना बोलावत नाही, तेच माझ्याकडे येतात' असे त्यास सांगितले. त्यावरही या पठ्ठ्याने, 'मग ते ज्या कामासाठी आले होते, ते मीडियाच्या माध्यमातून आपण स्पष्ट करावे' असा सल्लाच साहेबांना दिला. अर्थात हा दोघांमधील संवाद जेव्हा बाहेर चर्चिला गेला, तेव्हा मात्र अनेकजण अवाक् झाले. काहींनी तर यावर बोलणेदेखील टाळले.
कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर राज यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कानमंत्र दिला. 'जनतेत जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, त्यावर काम करा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष घराघरात पोहोचला पाहिजे', असा आदेशही त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
तीन दिवसीय दौऱ्यासाठी आलेल्या राज ठाकरे यांनी मात्र, दीड दिवसातच आपला दौरा गुंडाळला. पहिल्या दिवशी त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन सकाळी ११ वाजताच ते मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणेही टाळले. जे बोलायचे ते ३० जानेवारीच्या मेळाव्यात बोलणार एवढीच त्यांनी प्रतिक्रिया दिली.