

वणी (नाशिक) : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून ‘ड्राय- डे’ जाहीर करण्यात आला होता. या दिवशी कुठल्याही प्रकारे मद्य विक्रीला पूर्ण बंद असताना वणी शहर व परिसरात मात्र, सर्रास अवैध मद्यविक्री सुरू असल्याचे दिसून आले. अधिकृत मद्यविक्रीचे दुकाने बंद असताना त्याच्याच कामगारांकडून लपूनछपून मद्यविक्री सुरू ठेवण्यात आल्याने या दिवशी ‘ड्राय डे’ नावालाच असल्याचे दिसून आले.
अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची करण्याची प्रमुख जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागासह व पोलिस यंत्रणेची आहे. परंतू या विभागाचेच दुर्लक्ष असल्याने अवैध व्यवसायिकांना मोकळे राणं मिळाल्याचे चित्र दिवसभर होते. शहरातील अधिकृत विक्रेत्यांकडून वाईन शॉप बंद ठेवून आजूबाजूच्या 'चखना' विक्री दुकानांतून मद्यविक्री सुरू ठेवल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या व्यवसायिकांना विभागातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने हा धंदा बिनबोभाट सुरू असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. याच दिवशी ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची सरकारी गाडी (एमएच 15 ईए 0317) वणी येथील वाईन शाॅप परिसरात आली. यातील अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले देखील मात्र, त्याच्याकडे केवळ एक दारूची बाॅटल असल्याचे दाखवण्यात आले. ही बाब नागरिकांमध्ये संशय निर्माण करणारी ठरत आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण उपविभागाच्या पथकाने कळवण, पेठ, सप्तशृंगी गड, वणी आणि पिंपळगाव येथे छापे टाकले. या कारवाईत १९,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये ४० लिटर देशी व ७ लिटर विदेशी दारूचा समावेश असून दहा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
विक्रेत्यांना छुपे संरक्षण
वणी शहर व परिसरात ‘ड्राय डे’ला लाखो रूपयांची अवैध मद्यविक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अवघ्या १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विभागीय अधिकाऱ्यांचे 'लागेबांधे' आणि अवैध दारू विक्रेत्यांना मिळणारे छुपे संरक्षण यावर परिसरात जोरदार चर्चा होत आहे.