

Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. रविवारी (दि.6) रोजी पावसाचा जोर अधिक असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग आला आहे. तळवाडे येथे योग विद्याधाम समोर असलेल्या एका फार्म हाऊसवरील शेततळ्यात नाशिकचा एक युवक बुडाला असून, त्याचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता.
रविवारी (दि.6) रोजी दुपारी दुगारवाडी धबधब्यावर गेलेले काही पर्यटक अचानक आलेल्या पूरामुळे नदीच्या दुसऱ्या बाजूला अडकले. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार श्वेता संचेती आणि निवासी नायब तहसीलदार एस. बी. पवार यांनी तात्काळ मदत पथकाला पाचारण केले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दोराच्या साहाय्याने अडकलेल्या पर्यटकांची सुरक्षित सुटका केली. पेगलवाडी फाटा परिसरातील पहिणे येथे दोन युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना वाचवले.