

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबरपासून राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल आणि नामांकित शाळेतील प्रवेशित अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी स्पर्धेच्या विविध टप्यावर आपल्या कलाविष्काराचे दर्शन घडविणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाईन प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबरमध्ये राज्यातील १० केंद्रांवर होणार आहे. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका वेळेत सादर करण्याच्या सूचना चारही अपर आयुक्तांसह सर्व प्रकल्प अधिकार्यांना दिल्या आहेत.
स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निर्धारित केंद्रावर व तारखेस प्रयोग न सादर केल्यास, प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा केली जाईल. शासन नियमांचे पालन बंधनकारक असून उल्लंघन झाल्यास संबंधित विद्यार्थी अपात्र ठरवले जाईल, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाने दिली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत काही कलागुण असतात. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत घडू शकतात. राज्य बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय