

नाशिक : गत आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यातील शेतीपीके संकटात सापडलेली असतांनाच शुक्रवारी (दि. 27) बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात तर शनिवारी (दि.28) निफाड, देवळा, सिन्नरमध्ये जोरदा वार्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील करोडोंची द्राक्ष, कांदा पिके संकटात सापडली असून या अस्मानी संकटामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
ग्रामीण भागात थंडीचा कडाका जाणवत असतांना सोमवारपासून (दि. 23) अचानक ढगाळ हवामान तयार झाले. यामुळे द्राक्ष पिकांवर बुरशी आणि रोगजंतूचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे त्यातच अवकाळी पावसाने अचानक दणका दिला. अवकाळीच्या दणक्याने द्राक्ष पिकांवर डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू अँथ्रक्नोज, ब्लॉक रोट तर कांदा पिकांवर करपा, डाऊनी मिल्ड्यू, बॅसल रोट, बॅक्टेरिअल सोफ्ट रोट हे रोग पसरून पीक नष्ट होण्याची भीती आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांवर औषधांची दुहेरी फवारणी करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. द्राक्षपंढरी समजल्या जाणार्या पिंपळगाव बसवंत परिसरातही जोरदार वार्यासह अवकाळीने हजेरी लावल्याने द्राक्ष पिकांना फटका बसणार आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे आगमन सुखावह झाले होते. पारा 9 डिग्रीपर्यंत खाली आलेला असतांना शहरवााशिय थंडीचा आनंद घेत होते. ग्रामीण भागातही थंडी वाढल्याने शेतीपिकांना फायद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र, अचानक अवकाळीने दणका दिल्याने शेतकर्यांचे धाबे दणाणले आहेत. थंडीचा हंगाम सुरु होताच गहु, हरबरा, पिके जोमात आहे तर दुसरीकडे चालू हंगामात कांदा रोपांची पिके कमी तयार झालेली आहेत, अशा परिस्थितीत अवकाळीने शेतकर्यांची चिंता वाढविली आहे.
अवकाळीच्या फटक्याने द्राक्षासह आंबा, गहू, हरबरा, ज्वारी, मका या पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीमाला भाव नसल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच आता अवकाळीने कहर केल्याने शेतकर्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
22 नोव्हेंबररोजी वायव्य उत्तर भारतात निर्माण झालेल्या पश्चिमी झंझावाताचा परिणाम थेट मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रावर झाल्यामुळे अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामन तज्ञांनी वर्तविली होती. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील 8 दिवस ढगाळ हवामान कायम राहण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.