

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक झालेल्या डॉ. स्वाती चव्हाण यांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी (दि. ५) मंजूर केला. या प्रकरणात डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यासह डॉ. चव्हाण यांना पोलिसांनी संशयित आरोपी केले होते. दोघांनाही अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली होती.
डॉ. चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश के. के. पाटील यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीवेळी डॉ. चव्हाण यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अविनाश भिडे यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर विविध मुद्दे मांडत आपल्या जामीन देण्याची मागणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले.
प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे, तपासाची सद्यस्थिती आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने डॉ. स्वाती चव्हाण यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळे त्यांना कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, याच प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. नीलेश जेजूरकर यांना अद्याप जामीन मिळालेला नसून ते कारागृहातच आहेत. डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यामध्ये नेमकी कोणाची भूमिका होती, याचा तपास करण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पुढील सुनावण्यांकडे आता लक्ष लागले आहे.