

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुशील आय केअर संचलित अग्रवाल आय हॉस्पिटलमध्ये कृत्रिम डोळ्याच्या (बोस्टन-के-प्रो) सहाय्याने अंधत्वावर मात करत महिलेची दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात यश मिळवले आहे. डॉ. शरद पाटील व त्यांच्या टीमने ही अत्याधुनिक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुवर्णा बच्छाव (३०) यांची 'झेरोडर्मा पिगमेंटोसम' या दुर्मीळ आजार झाल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून दृष्टी गेली होती.
२०२२ ते २०२६ दरम्यान त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर स्टेम सेल ट्रान्सप्लांट, कॉर्निया प्रत्यारोपण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि १३ मे २०२६ रोजी बोस्टन-के-प्रो यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे नाशिकमध्ये नेत्रचिकित्सा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण वैद्यकीय कामगिरीची नोंद झाली आहे.
डॉ. शरद पाटील आमच्यासाठी देवासारखे धावून आले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आयुष्यात आलेले संकट आणि या संकटात मिळालेली सुशील हॉस्पिटलची मिळालेली साथ मोलाची आहे. अंधत्वावर मात करत आता वाचन करता येत असल्याची भावना सुवर्णा बच्छाव कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली.
रुग्णाच्या लिम्बल स्टेम सेल निकामी झाल्याने पूर्वी रुग्णाच्या आईच्या स्टेम सेलद्वारे उपचार करण्यात आले होते. मात्र, उपचारात खंड पडल्याने दृष्टी पुन्हा गेली. त्यानंतर बोस्टन के प्रो कृत्रिम बुब्बुळ रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा स्पष्ट दिसू लागले आहे. उत्तर महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना सुशील नेत्रपेढीत मोफत बुब्बुळ उपलब्ध करून दिले जात आहे. येथील नेत्रपेढी २० वर्षांपासून सेवेत असून स्वतंत्र' आय बँक' उपलब्ध आहे. नाशिकमधून वर्षाला १४० नेत्रदान करणारे मिळाले असून, नेत्रदात्यांत वाढ होणे अपेक्षित आहे.
- डॉ. शरद पाटील, अग्रवाल आय हॉस्पिटल