

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे रविवारी (दि. 18) नाशिकमध्ये आगमन झाले. भोसला सैनिक विद्यालयाच्या परिसरात 11 मे पासून सुरु असलेल्या संघ शिक्षावर्गाला ते सोमवारी (दि.19) मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा 'कार्यकर्ता विकास वर्ग- प्रथम' (सामान्य) 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग रविवारपासून सुरू आहे. या शिक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक आले आहेत. त्यांचे रविवारी दुपारी 4.30 च्या सुमारास शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईदर्शनानंतर ते 5.30 वाजता नाशिकडे रवाना झाले. सायंकाळी 6.30 च्या दरम्यान त्यांचे भोसला सैनिकी विद्यालयात आगमन झाले. पुढीत तीन दिवस ते वर्गस्थानी मुक्कामी असणार आहेत. या तीन दिवसांत ते शिक्षार्थींना मार्गर्शन करतील. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील. यादरम्यान त्यांचे कोणतेही जाहीर कार्यक्रम नसल्याचे संघाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, या वर्गात सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हे ही मार्गदर्शन करणार आहेत.
1 जूनपर्यंत चालणार्या या संघाच्या या वर्गात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून म्हणजे संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील 280 स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. यात शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर्स, वकिल, व्यापारी, शिक्षक आदिंसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत.