

लासलगाव (नाशिक) : आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू तसेच सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या दुर्गा दिलीप गुंजाळ हिची भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार २०२५' साठी निवड झाली. ए. डी. फाउंडेशन, सोलापूर- सांगलीच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, दि. २६ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या विशेष समारंभात दुर्गाला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराची घोषणा ए. डी. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी केली. दुर्गाने संपूर्ण भारतासह थायलंडमध्ये स्केटिंग स्पर्धांमध्ये भाग घेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे आपल्या स्केटिंग खेळातून मिळालेल्या पैशातून तिने अनाथ, गरीब, वृद्धांच्या औषधोपचाराची जबाबदारी उचलून, त्यांना वॉकर देणे, केस कापून देणे तसेच भाकड गाईंसाठी चारा, औषधे पुरवणे अशी समाजसेवा अविरत सुरू ठेवली आहे. दुर्गा ही विसा स्केटिंग अकॅडमीची खेळाडू असून, तिचे प्रशिक्षक श्याम चौधरी यांचे मार्गदर्शन तिला लाभले. तिच्या या यशाबद्दल जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमाचे संस्थापक स्वामी वासुदेवानंदगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज, महाराष्ट्र पीठाधीश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वरानंदगिरी महाराज आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.