डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन विशेष : काँग्रेसला होती स्वतंत्र मजूर पक्षाची धास्ती

चाळीसगाव सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता एकजुटीचा नारा
नाशिक
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर महाराष्ट्रावर विशेष प्रेम होते. १९४० मध्ये जेव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ होती, तेव्हा ते नाशिकला शांताबाई दाणी यांच्या घराशेजारील बंगल्यात वास्तव्यास आले होते. त्यावेळचे हे दुर्मीळ छायाचित्र.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

पन्नास वर्षांच्या काँग्रेसच्या मनात दीड- दोन वर्षाच्या स्वतंत्र मजूर पक्षाची प्रचंड धास्ती होती. त्यावेळी पक्षाच्या निवडून आलेल्या अवघ्या १५ लोकांनी काँग्रेसला भंडावून सोडले होते, असा खुलासा दस्तूरखुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २७ जून १९३८ साली धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या जाहीर सभेत केला होता. जर ही संख्या १५ ऐवजी ३० किंवा ४५ असती, तर आपलेच राज्य असते. त्यामुळे 'एकजूट राहा' असा नाराही त्यांनी दिला होता.

डॉ. आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. इंग्लंडमधील मजूर पक्षाचा आदर्श समोर ठेवून त्यांनी आपल्या पक्षाची घटना, कार्यक्रम, ध्येय, उद्दिष्टे ठरविली. फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई व वऱ्हाड मध्य प्रांताच्या विधानमंडळाच्या निवडणुका स्वतंत्र मजूर पक्षाने लढविल्या. यात पक्षाचे १५ लोक निवडले गेले. याचाच संदर्भ देत, धुळ्यात १७ जून १९३८ रोजी झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेबांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. 'डोकावूनसुद्धा ज्यांची सावली लोक घेत नव्हते, त्यांचीच १५ माणसे असेंब्लीत बसून अधिकाराने व हक्काने आपली गाऱ्हाणी सांगू शकतात. मुंबईच्या कायदेमंडळात काँग्रेससारखी प्रबळ संस्था आहे. एवढ्या मोठ्या संस्थेस स्वतंत्र मजूर पक्षाची भीती वाटते. ही गोष्ट अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने काही कमी नाही. काँग्रेसमध्ये लाखो रुपये खर्च करणारे सावकार आहेत. शिक्षणामध्ये पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. काही म्हटले, तरी तिच्या पाठीमागे ५० वर्षांचा इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापून अवघे एक वर्ष झाले आहे, तरी एका वर्षात कामगिरी इतकी मोठी झाली आहे की, स्वतंत्र मजूर पक्षाचे नाव ठाऊक नाही, असा एकही स्त्री- पुरुष संपूर्ण भारतात आढळणार नाही. त्यामुळे या पक्षाची भीती इतरांना वाटते, हा राजकारणातील विलक्षण प्रकार आहे. मराठा अगर कुणबी यांना आपणाजवळ याचना करण्याची लाज वाटत होती, ते लोक जाहीर रीतीने आपल्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिले आहेत. स्वतंत्र मजूर पक्षात कायस्थ, मराठा वगैरे जातींचा समावेश आहे, ही गोष्ट भारताच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. त्यामुळे राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेव जरी आड आला, तरी थांबवू शकणार नाही, अशी गर्जना बाबासाहेबांनी केली होती.

तसेच चाळीसगावच्या सभेत, पुढील १०-१५ वर्षांत एकी केली, तर खात्रीने सांगतो, आपलेच राज्य होईल, असे आवाहनही त्यांनी केले होते. या सभेला डी. एम. मागाडे, हरिभाऊ कन्नडकर, शांताबाई चव्हाण, डी. एन. भागाडे आदी उपस्थित होते.

वल्लभभाई पटेल यांचेही गौरवोद्गार

चाळीसगावच्या सभेत डॉ. बाबासाहेबांनी, काँग्रेसचे अध्वर्यू वल्लभभाई पटेल यांनी पक्षाबद्दल काढलेले गौरवोद्गारही जाहीरपणे सांगितले होते. 'संघटना असावी, तर डॉ. आंबेडकरांच्या संघटनेसारखी!' असे वल्लभभाई पटेल म्हणाले होते. त्यामुळे संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दूध नुसत्या मिठाच्या खड्याने नासते. पुष्कळसे अमृत विषाच्या नुसत्या थेंबाने बिघडते. त्यामुळे कंटकस्वार्थी माणसांना खड्यासारखे निवडून टाकले पाहिजे, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले होते.

नाशिक
भीमराज साळुंके Pudhari News Network

नाशिक जिल्ह्यातील निफाडचे माझे आजोबा कॅप्टन भीमराव साळुंके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धाडसी अंगरक्षक होते. त्यांना बाबासाहेबांसोबत बराच सहवास लाभला. बाबासाहेबांच्या अनेक सभांचे नियोजन त्यांच्याकडे होते. माझे वडील प्रतापराव साळुंके यांनी सभांमधील भाषणे, दुर्मीळ फोटो यांचे पुस्तकरूपी जतन केले आहे.

भीमराज साळुंके (कॅप्टन भीमराव साळुंके यांचे नातू)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news