नाशिक : गौरव अहिरे
पती- पत्नीच्या नात्यांला वादाची किनार लागल्यानंतर प्रकरणे थेट पोलिसांकडे तसेच न्यायालयात जातात. घटस्फोटासह पतीकडून खावटी मिळवण्यासाठी विवाहिता न्याय मागतात. इतर प्रकरणांप्रमाणेच विवाहितांच्या तक्रारींचे अनेक प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या २३५ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत. चालू वर्षात तीन लोकअदालतींच्या माध्यमातून घडलेला हा समिट कुंटूंब व्यवस्थेसाठी अशादायक ठरला आहे.
विवाहितांच्या छळाची कारणे अशी
माहेरून पैसे, दागिने आणण्यासाठी दबाव
पतीचे विवाहबाह्य संबंध
स्वयंपाक, घरकाम येत नसल्याचा आरोप करत छळ येणे
विवाहितेस नोकरी असल्याने घरकामाकडे दुर्लक्ष होत असल्याने छळ
विवाहितांकडून मोबाइल, सोशल मीडियाचा होणारा वाढता वापर
पती- पत्नीमधील वाद सुरु झाल्यानंतर घरात वाद न मिटल्यास सुरुवातीस पोलिसांकडे तक्रारी केल्या जातात. त्यानुसार महिला सुरक्षा शाखेत जानेवारी ते ऑक्टोबर अखेर ५७२ विवाहितांनी सासरच्या नातलगांविरोधात तक्रारी केल्या आहेत. पतीकडील सासरचे नातलग पैसे, सोन्याचे दागिन्यांची मागणी करीत किंवा दिसण्यावरून इतर कारणांवरून छळ करीत असल्याच्या तक्रारी विवाहितांचे असतात. तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही पक्षकारांचे समुपदेशन करीत वाद मिटवण्यास सांगतात. तसेच काही तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातात. त्यानुसार चालू वर्षात शहरातील १३ पोलिस ठाण्यांमध्ये विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी १३९ गुन्हे दाखल आहेत. तसेच न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा लोकअदालीत निपटारा करण्यात येत असतो. त्यानुसार २३५ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुर्वव्रत करण्यात लोकअदालतीत यश आले आहे. त्यामुळे २३५ जोडप्यांनी वाद विसरून नव्याने संसार सुरु केले.
पैसे, दागिने व इतर कारणांवरून विवाहितांचा सासरच्यांकडून छळ सुरु असल्याचे प्रकरणे समोर येतात. त्यानुसार उपनगर येथील दीड महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून जीवनप्रवास संपवला. त्यामुळे पतीसह सासरच्या नातलगांविरोधात हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितांनी जीवनप्रवास संपवला, मात्र, कोणी तक्रार न केल्याने किंवा पुरावे नसल्याने याप्रकरणी गुन्हे दाखल नसल्याचे सुत्रांनी सांगितले.