

नाशिक: ऑनलाईन शॉपिंगत क्रेझ, मध्यमवर्गीयांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे दिवाळीतील भेटवस्तूरुपी बाजाराची उलाढाल प्रत्येक वर्षी १५ हजार कोटी रुपयांनी वाढत चालली आहे. यंदा गिफ्ट वस्तूंची उलाढाल तब्बल दोन लाख कोटी रुपयांवर पोहचणार असल्याचा अंदाज टेक्नोपॅक ॲडव्हाजर्स, ॲलाईड मार्केट रिसर्चसारख्या संस्थांनी आपल्या संशोधनात्मक अहवालात व्यक्त केला आहे.
२०२३ मध्ये भारतातील दिवाळीसाठी गिफ्ट वस्तूंची बाजारपेठ : दोन लाख कोटी रु.
गिफ्ट वस्तूंच्या बाजारपेठेची वार्षिक वृध्दी: १५ टक्के
दिवाळीच्या भेटवस्तूंवर भारतीय कुटुंबांचा सरासरी खर्च : 5,000 रुपये
भारतातील सर्वात लोकप्रिय दिवाळी भेटवस्तू: मिठाई, सुका मेवा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्तर, उटणे, शोभेच्या वस्तू
दिवाळीसाठी यंदा विविध कंपन्यांनी आरोग्यदायी मिठाई, सुकामेव्याचे अनेक प्रकार आणले असून दुकाने फुलून गेली आहेत. कोरोना लाटेनंतर दिवाळीत भेटवस्तू देण्याच्या नवीन प्रवाह मध्यमवर्गियांमध्ये रुजला आहे. आरोग्यदायी भेटवस्तू देण्याचा कल त्यांच्यात वाढला आहे. पुर्वी शहरापुरता मर्यादीत असलेला हा प्रकार आता गावपातळीवरसुध्दा रुजला असून तरुणतरुणींमध्ये त्यांची क्रेझ वाढली आहे.
दिवाळीनिमित्त फराळांच्या पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या मिठाई, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, भाजलेले काजू, पिस्ता, चॉकलेटस्, मुखवास यांचा समावेश असून दरवर्षी यात नवनवीन वस्तूंची भेट पडत चालली आहे. विविध प्रकारची उची अत्तरे, सुगंधी साबण, सुगंधी उटणे, रंगीबेरंगी छोटे आकाशकंदील, शोभेच्या पणत्या, बेडरुम सजावटीचे साहित्य यांनीही गिफ्ट पॅकमध्ये जागा पटकावली आहे. निसर्गप्रेमी व्यक्ती आपल्या आप्तजनांना आयुर्वेदीक वस्तू पाठवत असल्याचे पेठरोडवरील बाजार समितीतील होलसेल विक्रेते जयंती जैन यांनी सांगितले. हा नवीन ट्रेंड चांगलाच रुळला असून आता दुकानात यासाठी खास जागा ठेवावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदेशातील आपल्या नातेवाईकांना गिफ्ट पाठविण्याच्या ट्रेंडही रुजला आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातून किमान ५० कोटींची दिवाळी गिफ्ट अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कोरिया, जपान, सिंगापूर, मलेशिया आदी देशात नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या मुलामुलींना नाशिककर पालकांनी गेल्या वीस दिवसांपासून गिफ्ट बॉक्सेस पाठवण्याचा सपाटा लावला आहे. खासगी कुरियर कंपन्यांची उलाढाल यंदा किमान १०० कोटी रुपयांच्या आसपास राहण्याचा अंदाज कुरियर एजंट कांतीलाल मुनोत यांनी व्यक्त केला.
यंदाच्या सणासुदीत काजू आणि तत्सम सुकामेव्याची भेट देणे खर्चिक झाले आहे. गेल्या चार महिन्यांत काजूच्या किमती 80 टक्क्यांपर्यंत, तर बदाम 15 टक्क्यांहून अधिक महाग झाले आहेत. दिवाळीपर्यंत किमती आणखी 5-10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक मागणीत किमान ३० टक्के वाढ असली तरी त्यातुलनेत आयात कमी असल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
आरोग्यदायी स्नॅकिंगमध्ये अनेक फूड्स कंपन्या अग्रेसर आहेत. त्यांनी खास तयार केलेल्या गिफ्ट पॅकची प्रीमियम श्रेणी यंदा बाजारात पहायला मिळत आहे. पौष्टिकतेसह परंपरेचे मिश्रण हे पॅक सादर करतात. दिवाळीत कौटुंबिक भेटीगाठीत आनंद फुलविण्यासाठी, कॉर्पोरेट गिफ्ट या दृष्टीकोनातून हे पॅक आदर्श पर्याय ठरले आहेत. दिवाळीसारख्या सणासुदीच्या क्षणात अभिजातपणा, लावण्यता अन निरोगीपणा फुलविण्याबरोबरच भेटवस्तूंना अतिशय आगळेवेगळे रुप गिफ्ट पॅकला दिसत आहे.
प्रिमियम बदाम, काजू, पिस्ता आणि मनुका यांचे परिपूर्ण मिश्रण दिवाळीतील प्रत्येक प्रसंग साजरा करण्यासाठी योग्य आकारात कंपन्यांनी उपलब्ध करुन दिले आहे. 799 रुपयांना 300 ग्रॅम, 1,199 रुपयामध्ये 400 ग्रॅम, 1,599 रुपयामध्ये 600 ग्रॅम तर 1,999 रुपयामध्ये 800 ग्रॅम असे सुकामेव्याचे बॉक्सेस यंदा बाजारपेठेत आहेत. याशिवाय ट्रेल मिक्स, फ्लेवर्ड नट्स, चॉकलेट-कोटेड बदाम किंवा रीगल एक्सएक्सएल अल्ट्रा-प्रीमियमसारखे संयुक्त प्रकार प्रियजनांसाठी खास भेटीसाठी आहेत.