

बोरगाव (नाशिक) : नाशिकलगतच्या सापुतारा पर्यटनस्थळी दिवाळी सुट्यांनिमित्त पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळळी आहे. गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांतील पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावल्याने हॉटेल्स हाउसफुल्ल झाली, तर निवासासाठी जागा नसल्याने वणी शहरात पर्यटकांनी निवास व्यवस्थेस अग्रकम दिला होता.
दिवाळीनिमित्त गुजरातमधील सर्व व्यावसायिक आस्थापना, उद्योग बंद असतात. कुटुंबीयांसमवेत पर्यटनास अग्रक्रम देण्यात येतो. गुजरात राज्याचे शेवटचे टोक असा परिचय सापुतारा पर्यटनस्थळाचा आहे. ते थंड हवेचे ठिकाण असून, निसर्गाने मुक्त हस्ते, कृपादृष्टी केल्याने डोंगरदर्या, वनराई, सर्वत्र हिरवळ अशा नैसर्गिक वातावरणाबरोबरच सनसेट, सनराइज, बोटिंग, म्युझियम, हस्तकलेबरोबर विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे स्टॉल्स, पॅराग्लायडिंग, रोपवे, विविध प्रकारच्या राइड्स पर्यटकांना खुणावतात. तसेच अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, आकर्षक गार्डन यांचीही रेलचेल असल्याने सुट्यांचा कालावधी पर्यटक येथे आनंदाने चालवतात.
दरम्यान, महागडे व उंची हॉटेल्स व लॉजिंग सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असले, तरी विशिष्ट वर्गाला अशा अत्याधुनिक सुविधा हव्या असल्याने ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. या मानसिकतेमुळे सापुतारा येथे पर्यटन दीपावलीत गतिमान झाले. यातून अनेकांना सहजगत्या रोजगार उपलब्ध झाला. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक सापुतारा येथे डेरेदाखल झाल्याने निवासासाठी जागा नाही, तर नाश्ता व जेवणासाठी वेटिंग अशी परिस्थिती असल्याने अनेकांनी वणी शहराची वाट धरली आहे. त्यामुळे वणीतील हाॅटेल्स हाउसफुल्ल झाली होती, तर कुटुंब व मित्र परिवाराबरोबर निसर्गाच्या स्वनिध्यात निखळ आनंद मिळविण्यासाठी वेळ काढत सापुतारा पर्यटनाला महाराष्ट्र व गुजरात आर्थिक उलाढालीत गतिमानता आली.