नाशिक :'दिवाळी सण मोठा, खरेदीचा नाही तोटा' याप्रमाणे दिवाळी अगोदर आलेल्या रविवारचा योग साधत नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी करीत, विविध वस्तूंच्या खरेदीचा 'बार' उडवून दिला. कपडे, मिठाई, रेडीमेड फराळ यासह फटाके, शोभेच्छा वस्तू, पूजेचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंंबड उडाली होती. त्यामुळे बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याने, व्यापारीवर्ग सुखावला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांसह सर्वच घटक सुखावला आहे. त्यामुळे यंदाची सर्वांचीच दिवाळी जोरात असून, बाजारात गर्दीतून ते दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, खरेदीवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी नाशिककरांनी सहकुटुंब बाजार गाठत खरेदीचा आनंद घेतला. आकाशकंदील, पणत्या, मेणबत्त्या, रांगोळीची विविध डिझाइन्स, कापूस, वाती, उटणे, मातीचे दिवे, देवीचे मुकुट, तोरण, लक्ष्मीची पावले यासह पूजेचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. दिवाळीत नवीन कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने, कपडे खरेदीसाठी नाशिककरांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा या प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ होती.
बाजारात कृत्रिम झेंडूची फुले असलेले तोरण उपलब्ध करून दिल्याने, ते खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. शोभेच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. मिठाई तसेच रेडीमेड फराळ खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. शहरात विविध भागांमध्ये मॉल उभारले असून, तिथेही खरेदीचा उत्साह दिसून आला. ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद लाभत असल्याने विक्रेते सुखावले असून, पुढील काही दिवस बाजारात ग्राहकांची वर्दळ कायम राहणार आहे.
शासकीय तसेच खासगी सेवेतील बहुतांश कर्मचाऱ्यांचे बोनस आणि वेतन एकत्रित दिले गेल्याने सुटीचा दिवस बघून या कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. सकाळी १० पासूनच बाजारात वर्दळ सुरू झाली. सायंकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केलेली होती. यावेळी वाहतुकीचा काही प्रमाणात खोळंबा झाल्याचे दिसून आले.
खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी विक्रेत्यांनी आपल्या आस्थापनांसमोर स्वागतपर कमानी उभारल्या होत्या. काही विक्रेत्यांकडून खरेदीवर ग्राहकांना आकर्षक गिफ्टही दिले जात आहे. विशेष आॅफर्स तसेच लकी ड्रॉ उपलब्ध करून दिल्याने, ग्राहकदेखील खरेदीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बघता, कामगारांची जुळवाजुळव करताना विक्रेत्यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे.
शालिमार येथे अवघ्या दोनशे रुपयात मुलांचा ड्रेस विक्रीस उपलब्ध करून दिल्याने खरेदीसाठी झुंबड उडत आहे. तरुणींचा टॉप दोनशे रुपयांपासून मिळत आहे. याशिवाय थंडीचे जॅकेटही बाजारात विक्रीस आले असून, अवघ्या पाचशे रुपयांत उबदार जॅकेट मिळत असल्याने तेदेखील खरेदी केले जात आहेत. याशिवाय महिलांच्या कॉस्मेटिक वस्तूही मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या असून, त्या खरेदीकडे कल दिसून येत आहे.