

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या कमालीच्या अस्थिरतेमुळे जगभरातील शेअरबाजारात घसरण सुरू झाली आहे. अमेरिकेत एआय बबल फुटण्याच्या धोक्यामुळे गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतीय शेअरबाजाराने शून्य परतावा दिलेला आहे. अशा स्थितीत आता डिव्हिडंड यील्ड फंडच गुंतवणूकदारांना तारत असल्याचे अॅम्फीच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
भारतातील लाभांश गुंतवणूक ही संकल्पना सातत्याने लोकप्रिय होत आहे. या धारणेमागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदार दीर्घकालीन भांडवल वृद्धी, पोर्टफोलिओची स्थिरता आणि नियमित उत्पन्नाची क्षमता या तिन्हींच्या एकत्रित फायद्यांचा शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर डिव्हिडंड यील्ड फंड गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत असून, सध्याच्या अस्थिर वातावरणात लाभांश उत्पन्नावर आधारित फंडांना गुंतवणूकदारांचे प्राधान्य मिळत आहे.
गत वीस वर्षांपासून या प्रकारातील अनेक फंड दमदार वाटचाल करत आहे. या फंडातील गुंतवणूक अॅम्फीच्या आकडेवारीनुसार ३२ हजार कोटींवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये सुमारे २९१ कोटी रुपये तर मे मध्ये साधारण तितकीच रक्कम या फंडात आले. या श्रेणीतील आघाडीवर असलेल्या फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या फ्रैंकलिन इंडिया डिव्हिडंड यील्ड फंडाने २० वर्षांची वाटचाल करताना या फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेने (एयूएम) २,३०० कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे.
लाभांश उत्पन्नावर आधारित समभागांत गुंतवणूक धोरणाचा हा फंड अवलंब करतो. 'निफ्टी डिव्हिडंड ऑपॉच्र्युनिटीज ५० इंडेक्स' या आधारभूत निर्देशांकाच्या तुलनेत अधिक दमदार आणि सरस कामगिरी बजावली आहे. बाजारातील चढ-उतारांच्या चक्रामध्ये सर्वोत्तम 'जोखीम समायोजित परतावा' मिळवणे, हा डिव्हिडंड यील्ड फंडातील गुंतवणुकीचा उद्देश आहे.
योजनेच्या शुभारंभावेळी केलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक ३० एप्रिल २०२६ पर्यंत जवळपास १३ पटीने वाढून अंदाजे १३.६० लाख रुपये झाली असती, म्हणजेच वार्षिक १३.९७टक्के चक्रवाढ वाढीचा दर मिळाला असता.
या तुलनेत, याच कालावधीत 'निफ्टी ५०० टीआरआय'मध्ये केलेल्या तितक्याच गुंतवणुकीचे मूल्य अंदाजे १०.३ लाख रुपये झाले असते, म्हणजेच केवळ १२.३९ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा मिळाला असता. डिव्हिडंड यील्ड फंड सातत्यपूर्ण आणि वाढता लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा शोध घेतो.
अशा प्रकारची गुंतवणूक करत बाजाराच्या चढ-उतारांच्या चक्रात घसरणीपासून संरक्षण मिळवताना सातत्याने चक्रवाढ परतावा मिळवण्याचे हे उद्दिष्ट असते. अशा कंपन्यांचे समभाग अनेकदा आकर्षक किंवा वाजवी मूल्यांकनावर उपलब्ध असतात आणि त्यामुळे भविष्यात त्यांचे बाजारमूल्य आणखी वाढण्याची क्षमतादेखील ३१,५१८ कोटी रु. असते, याकडे फ्रैंकलिन इंडिया डिव्हिडंड यील्ड फंडचे पोर्टफोलिओ मॅनेजर राजसा काकुलावरपू यांनी लक्ष वेधले आहे.