

नाशिकः पुढारी वृत्तसेवा
'अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, हे आमचं धोरण आहे. पण लक्षात ठेवा, मैं कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नहीं हैं' अशा अत्यंत कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली खदखद बोलून दाखवली.
मुंबईत राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, भुजबळ म्हणाले की.
'अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. मैं कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नहीं हैं', अशी सूचक टिप्पणी करत राजकीय डावपेचांवर अप्रत्यक्ष भाष्य केले. भुजबळ यांनी खुलासा करताना सांगितले की, समीर भुजबळ यांना मंत्रिपद आणि स्वतःला राज्यसभेची उमेदवारी असा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोर ठेवला होता. मात्र त्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ कमी होता.
भाजपकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही. फक्त मंत्रिमंडळ विस्तारानंतर समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. माझा प्रस्ताव नाकारण्यात आलेला नाही. मी नाराजही नाही. पण इतरांना जो न्याय मिळाला, तो मलाही मिळायला हवा, एवढीच अपेक्षा आहे. काही जण राज्यसभा, लोकसभा सदस्य आहेत आणि त्यांची मुलं मंत्रिपदावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मलाही तोच न्याय मिळायला हवा, असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भुजबळ समर्थकांत नाराजीचा सूर
भुजबळ यांची राज्यसभेची उमेदवारी अंतिम मानली जात होती. कोअर कमिटीत नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकमधील काही कार्यकर्त्यांना शक्तिप्रदर्शनाबाबत सांगण्यातदेखील आले होते. परंतु, ही उमेदवारी कापल्यानंतर भुजबळ समर्थकांत नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक भुजबळ समर्थकांनी स्टेटस ठेवत ही नाराजी व्यक्त केली.