

दिंडोरी ( नाशिक ) : महायुतीने सत्तेसाठी विविध खैरातीच्या योजनांची घोषणा केली, मात्र आता त्या योजना राबवण्यासाठी शासनाकडे निधीच नाही. विकासकामांना निधी नाही, राज्य शासनाची आर्थिक स्थिती दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची वृत्ती या सरकारकडे नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
तालुक्यातील खेडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बहुद्देशीय इमारत, सांस्कृतिक भवन आणि प्रवेशद्वार आदी विकासकामांचा प्रारंभ खासदार सुळे, मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खेडगावात भरीव विकासकामे होत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, पुढेही टप्प्याटप्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल.
खासदार भास्कर भगरे यांनी खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमात श्रीराम शेटे यांनी मार्गदर्शन केले. सरपंच पाटील यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण महाडिक व योगिता पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख जयंत दिंडे, चिंतामण गावित, गोकुळ पिंगळे, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, बाळासाहेब जाधव, प्रशांत कड, रावसाहेब संधान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
झिरवाळ तुम्हाला आम्ही पक्षाचे मानत नाही. तुमची आमची बांधिलकी वेगळी आहे. मी काय सरकारबद्दल बोलतेय तुम्ही जास्त मनावर घेऊ नका, असे खासदार सुळे यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.