

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यात दोन - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ९४ टक्के भरले असून, धरणातून कादवा नदीत ७०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कादवा काठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. आबासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे व धरण शाखा अभियंता दंडगव्हाण यांनी केले आहे.
तालुक्यात संततधार सुरूच असून, करंजवण धरणातून टप्प्या- टप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. पालखेड धरणातील साठा ६२.७९ टक्के असला, तरी पाणी साठ्यात वाढ होत असल्याने या धरणातूनही कादवा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता शाखा अभियंता सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.
करंजवण ९४.00
पुणेगाव ८७.२६
ओझरखेड 100
पालखेड ६२.७९
वाघाड तीसगाव 100
बुधवारी झालेला पाऊस (मीमी)
दिंडोरी 23.00
रामशेज 11.00
ननाशी 15.00
उमराळे 16.00
लखमापूर 12.00
कोशिंबे 09.00
मोहाडी 19.00
वरखेडा 02.00
वणी 06.00
मांजरपाडा प्रकल्प (देवसाणे) परिसरात तसेच पुणेगाव धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरण ८७.२६ टक्के भरले आहे. यापूर्वीच पुणेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ओझरखेड धरण ९८ टक्के भरले होते. आता सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्याने ओझरखेड धरणही १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. वाघाड, तीसगाव धरणे आधीच १०० टक्के भरली आहेत. अशीच संततधार सुरू राहिल्यास पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.