

नाशिक : देशात २०२४ मध्ये डिजीटल पेमेंट व्यवहारांपैकी जवळजवळ एक तृतीयांश व्यवहार हे क्रेडीट कार्ड अथवा इएमआय (समान मासिक हप्ते) च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
देशभरातील तब्बल २०,००० हून अधिक व्यापाऱ्यांकडील व्यवहारांच्या डेटाचे विश्लेषण करुन तयार करण्यात आलेल्या एका अहवालातून हा निष्कर्ष समोर आला आहे. ग्राहक कर्ज तसेच वैयक्तिक कर्जाच्या वाढीला आळा घालण्यासाठी नियामकांनी कडक उपाययोजनांवर भर दिलेला आहे. परंतु तरीही कर्जाच्या माध्यमातून डिजीटल व्यवहारांवर भर दिला जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
देशात एकूण डिजीटल पेमेंटमध्ये तब्बल ६५ टक्के व्यवहार हे युपीआयच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. लहान आणि मध्यम रक्कमेच्या व्यवहारांमध्ये युपीआयचा दबदबा आहे. तर मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी क्रेडीट कार्ड, इएमआयचा आधार घेण्यात आलेला आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि वाहन उद्योगाशी संबंधित पुरक क्षेत्रांत डिजीटल क्रेडीट व्यवहारात भरभक्कम वाढ झाली आहे. डिजीटल पेमेंट फिनटेक क्षेत्रातील फाय कॉमर्स या संस्थेने तयार केलेल्या हाऊ इंडिया पे या अहवालात युपीआय ही सुविधा डिजीटल पेमेंट विश्वात परिवर्तन करणारे प्रमुख साधन ठरल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. सणानिमित्त खरेदी, शाळाप्रवेश आणि हंगामावर आधारित खरेदीमुळे कर्जात वाढ होत चालली आहे. तसेच ग्राहक उच्च खर्चाच्या कालावधीत अल्प मुदतीच्या कर्जाचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. या अहवालात शिक्षण, रिटेल विक्री, आरोग्यसेवा, अन्न आणि रेस्टॉरंट्स, ई-कॉमर्स आणि ऑटोमोटिव्ह या निवडक क्षेत्रांमधील डिजिटल पेमेंटचे प्रवाहावर प्रकाशझोच टाकण्यात आला आहे.
दैनंदिन व्यवहारांसाठी युपीआय हा डीफॉल्ट पेमेंट पर्याय बनला आहे. व्यवहारातील गती, सहजता आणि त्वरित सौदापुर्तीला (सेटलमेंट) ग्राहकांचे प्राधान्य ही युपीआयच्या व्यापक स्वीकाराची प्रमुख कारणे ठरली आहेत. त्यामुळे युपीआय पेमेंट पध्दत ही रिटेल, फूड सर्व्हिस आणि सरकारी व्यवहारांसाठी प्राथमिक पर्याय ठरली आहे. परंतु दैनंदिन खर्चाव्यतिरिक्त, क्रेडिट-आधारित डिजिटल पेमेंटमध्ये विशेषतः क्रेडिट कार्ड आणि इएमआयचा वापर यातही लक्षणीय वाढ झाली आहे. यातून स्वतःवरील एकूण खर्चाचा एकदम भार उचलण्याऐवजी तो आगामी कालावधीपर्यंत कर्जाआधारे विभागला जात आहे.
भारतातील डिजिटल पेमेंट्समधील उत्क्रांती नवनवीन आर्थिक शक्यतांना आकार देत आहे. युपीआय आणि लवचिक क्रेडिट पर्याय हे आता मुख्य प्रवाह बनले असून सर्वसमावेशक वाढ आणि आर्थिक लवचिकता वाढविण्यासाठी या साधनांच्या अतिशय जबाबदारीने वापरास प्रोत्साहन देणाऱ्या घटकांचा भविष्यकाल उज्वल असल्याचे मत फाय कॉमर्सचे सह-संस्थापक आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख राजेश लोंढे यांनी केले आहे.
सध्याच्या काळात ग्राहक एकदम पैसे खर्च करण्याऐवजी वित्तपुरवठ्याचा पर्याय स्वीकारण्याबाबत अधिक खुल्या विचारांचे झाले आहेत. ही बाब विशेषतः शिक्षण (१०%), आरोग्यसेवा (१५%) आणि वाहन क्षेत्राशी संबंधित पुरक उत्पादने (१५%) यामध्ये दिसून येते. या क्षेत्रात जास्त रकमेची खरेदी ही प्रामुख्याने इमआय आणि क्रेडिट पर्यायांद्वारे केली जात आहे. शालेय शुल्क, वैद्यकीय खर्च आणि मोठ्या ऑनलाइन खरेदीसाठी इएमआयचा आधार हे आर्थिक वर्तनातील बदल दर्शवते. यातून पूर्णपणे परवडण्यायोग्य ते सहज व्यवस्थापन करता येईल तसेच टप्प्याटप्प्याने खर्च करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे.
सरकारी तसेच अन्य संस्थांमध्ये भरणा केले जाणारे आवर्ती पेमेंट (७५ टक्के) आता युपीआयच्या माध्यमातून केले जात आहे. यातून वाढलेली आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रणालीवरील वाढता विश्वास दिसून येतो. त्यामुळे पेमेंट चुकण्याचा धोका कमी झाला आहे. एकंदरीत, भारतीय ग्राहक खर्च करण्यासाठी अधिक संरचित, नियोजित आणि डिजिटल-फर्स्ट या दृष्टिकोनाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. दैनंदिन व्यवहारांवर युपीआय वर्चस्व गाजवत असताना, क्रेडिट आणि हप्त्यांवर आधारित पेमेंटसह वाढणारी सोय सखोल आर्थिक उत्क्रांतीचे संकेत देत आहेत. या उत्क्रांतीत आता व्यक्तीकडे किती रोख आहे, यापेक्षा संबंधित व्यक्ती खर्च किती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करते, यावर तिची परवडण्यायोग्य क्षमता अवलंबून आहे.