

सिन्नर (नाशिक) : समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ६) पहाटे डिझेल चोरी करताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून दोन जण स्कॉर्पिओमध्ये बसून पसार झाले. घटना सिन्नर तालुक्यातील गोंदे टोल प्लाझा परिसरात नागपूर कॉरिडॉरवर घडली.
शनिवारी (दि.6) पहाटे २.३० ते ३.०० वाजताच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक एम. एम. महात्मे, पोलिस हवालदार प्रवीण गुंजाळ तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकातील सुरक्षा रक्षक हिरे व हेंबाडे हे नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक ५५७.२ वरील अपघातस्थळाची पाहणी करून परतत असताना गोंदे टोल प्लाझा परिसरात पुलावर ट्रक व विनानंबर प्लेटची स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या उभी दिसली.
पोलिस पथकाने जागेवर जाऊन खात्री केली असता, तिथे तीन जण ट्रकमधून डिझेल चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यापैकी दोघे स्कॉर्पिओमध्ये बसून मुंबईकडे राँग साइडने पसार झाले, तर तिसऱ्या संशयिताने पळून जाण्याच्या प्रयत्नात समृद्धी महामार्गाच्या पुलावरून ३० ते ३५ फूट खाली उडी मारली. यात त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव चैतन्य नामदेव कुहे (रा. जालना) असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी व पुढील कारवाईसाठी वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गावडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रूपाली अंबुरे, उपअधीक्षक कुमुद कदम, पोलिस निरीक्षक भावना महाजन तसेच प्रभारी अधिकारी तुषार गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास वावी पोलिस करीत आहेत.