

नाशिक/इगतपुरी : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात झालेले गंभीर आरोप, करुणा शर्मांचे आरोप यातच मंत्रीपदाचा द्यावा लागलेला राजीनामा अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे मन:शांतीकडे वळाले आहेत. धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मीक कराड याला संशयित आरोपी करण्यात आल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार मुंडे यांच्या पाठींशी ठाम राहिले. देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र, मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांनी स्वतः ट्विट करत राजीनामाची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले होते. या पाठोपाठ घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयानेही मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले होते. या प्रकरणातही मुंडे यांचा पाय खोलात गेले होते. याच दरम्यान मुंडे यांना आजार झाल्याने ते सर्वांपासून अलिप्त होते. दरम्यान, मुंडे यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे सोपविल्याने मुंडेंची पुन्हा मंत्रीपदाची आशा मावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.