नाशिक : मंत्रिपद मिळण्यापूर्वी ‘जहाँ नही चैना वहा नही रहना’ अशा शब्दांत थेट पक्ष सोडण्याचा इशारा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या जागी कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर मोठे विधान केले आहे. ’धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे वक्तव्य करत भुजबळ यांनी राजकीय वर्तुळात खळबड उडवून दिली आहे. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भुजबळ यांनी हे विधान केले आहे. मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर काय करणार, असा सवाल भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर मुंडे यांना क्लीन चिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत माझी काहीही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, मला सन्मानाने परत बोलवले. मुंडे आरोपांतून मुक्त झाले, त्यांची लाइन क्लिअर झाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे भुजबळ म्हणाले.
यासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाली आहे का, असे विचारले असता यासंदर्भात चर्चा होवो अगर ना होवो राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.