नाशिक : नाशिक शहरातील युवकांची गरज ओळखून आयटी पार्कचा प्रस्ताव सर्वप्रथम आपण आणि तत्कालिन महापौर सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. त्यास मंजुरी देखील मिळविली होती; परंतु प्रशासकीय राजवटीमुळे हा महत्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहे. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यावर या प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे आश्वासन देताना आयटी पार्कच्या नावे विरोधकांकडून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका नाशिक मध्य मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार आ. देवयानी फरांदे यांनी केली आहे.
नाशिक मधील अनेक उच्चशिक्षित युवकांना नोकरीसाठी पुणे-बंगळुरू सारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आपण व तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव परिसरात आयटी पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली होती. या आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात ३६५ एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची दहा एकर जागा आरक्षित करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने मार्च २०२२ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी परिषदही आयोजित केली होती. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या प्रकल्पाला खोडा घातला गेला. मात्र केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले. या पार्कमुळे नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. शहरात दोन लाख रोजगार निर्माण होतील. महायुतीचे सरकार येताच प्राधान्याने आयटी पार्क च्या दिशेने पाऊलं टाकले जातील, असे फरांदे यांनी सांगितले.
नाशिक मध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून सर्वप्रथम माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळात प्रयत्न झाले. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प रखडला. राज्यात महायुतीची सत्ता येताच पुन्हा येता प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती देण्यात येईल.
-सतीश कुलकर्णी, माजी महापौर