

देवळाली कॅम्प (नाशिक) : केंद्र सरकारने देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांचे रूपांतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली असली, तरी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात अद्यापही सामसूम आहे. येथे नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या समस्या केंद्र सरकारकडे मांडाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधी सेल प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांनी पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन देवळाली कॅन्टोन्मेंटमधील विविध समस्यांबाबत चर्चा केली. कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये अनेक वर्षांपासून निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील प्रशासनाने बऱ्याच नागरिकांच्या घरापर्यंत सीवरेज लाइन जोडलेली नसतानाही सरसकट सर्व नागरिकांकडून सीवरेज टॅक्स अन्यायकारक पद्धतीने वसूल केला जात आहे. याबद्दल आवाज उठविण्याची मागणी त्यांनी केली.
सिंहस्थात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकरोड व देवळाली कॅम्प येथे रेल्वेच्या चार लाइन वाढविणे आवश्यक आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अवलंबल्यामुळे अडीच महिन्यांपूर्वीच इयत्ता दहावीचा निकाल लागूनही सद्यस्थितीची प्रवेशप्रक्रिया वेळखाऊ झाली आहे. या सर्व प्रश्नांवर पक्षीय पातळीवर मंथन होणे गरजेचे आहे. या मागण्यांचा पाठपुरावा पक्षाने करावा, असे आवाहन चावला यांनी शिंदे यांच्याकडे केले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे होते.