नाशिक : महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत पंचवटीमधील तपाेवन मैदान येथे शुक्रवारी (दि. २३) महिला मेळावा पार पडला. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. बदलापुरच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या काळात सांगली, पुणे, बीड व सिंधुदूर्ग येथे बलात्काराच्या घटना घडल्या. कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला, तेव्हा तुम्ही तोंड ऊघडले नाही. कोलकत्ता घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची स्तुती करण्यात तुम्ही मग्न होते. त्यावेळी तोंड का ऊघडले नाही, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी विराेधकांना केला. बदलापुर ची घटना दुर्देवी आहे. नराधमाला फाशीची शिक्षेपर्यंत पोहचविले जाईल. त्यामूळे या घटनेवरुन सुरु राजकीय पोळी भाजण्यापेक्षा समाजातील अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी एकत्रित येत प्रयत्न केले पाहिजे, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांचे कान टोचले.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन विरोधकांच्या पोटात गोळा ऊठला आहे. बँकखात्यात पैसे जमा झाल्यानंतर तातडीने काढून घेण्याचे वक्तव्य करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महिलांचा अपमान केला आहे. सोन्याचा चमचा जन्माला आलेल्यांना १५०० रुपयांचे माेल काय कळणार, अशा शब्दांत फडणवीस यांनी सुळेंवर निशाणा साधला. विरोधकांचा देशात मार्शल लॉ लागू करण्याचा इरादा आहे. पण देशाच्या संविधानात एवढी ताकद आहे की तुमचे इरादे पुर्ण होणार नाही. सत्तेत कोणीही आले तरी संविधानात बदल करण्याची हिंमत्त कोणतही नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
महायुती सरकारने पेसा भरती व कायदा लागू केला. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने पेसा भरती पूर्ण करण्यात येईल. आम्हाला तुमची चिंता असून कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ऊघड्यावर पडू देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी आदिवासी बांधवांना दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात आल्यावर तातडीने काढून घेण्याचे खा. सुळे यांचे वक्तव्य दुर्देवी आहे. सुळेंनी राज्यातील महिलांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. लाडकी बहिण योजना अंमलबजावणीत राज्यात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत जिल्ह्यातून ११ लाख ६६ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ लाख ८२ हजार अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष ७.२५ लाख महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले, अशी माहिती भुसे यांनी दिली.
बदलापुरची घटना दुर्दैवी असून घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पण या घटनेचा संबंध लाडकी बहिण योजनेशी जोडून योजनाच बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. लाडक्या बहिणाला टोकाचा विरोध का असा प्रश्न करताना सव्वा कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. चांगल्याला चांगले म्हणण्याची मानसिकता बाळगा अशा शब्दांत भुजबळ यांनी विरोधकांचे कान टाेचले.