

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साबरमतीच्या धर्तीवर गोदाघाट परिसरात 'राम काल पथ' प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकमेव पात्र ठरलेल्या गुजरातच्या एचसीपी कंपनीने आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर बुधवारी (दि.५) या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
- सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर सुशोभीकरण
- श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सौंदर्यीकरण
- अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामकुंड भागात सौंदर्यीकरण
- गांधी तलाव व रामकुंड परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती
- टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत
देशभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक व सिंधुदुर्ग या दोन शहरांमधील प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसर तसेच गोदाघाटावर 'राम काल पथ' प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून यासाठी ९९.१४ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी ६५ कोटींचा निधीही शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल या दरम्यान सुशोभिकरण त्याचप्रमाणे सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर व रामकुंडापर्यंतचा भाग रामकाल पथ योजनेंतर्गत विकसित केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे या प्रकल्पासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सविस्तार अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असून त्यासाठी आठ दिवसांची अल्प निविदा काढण्यात आली होती. या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अवच्या दोनच सल्लागार कंपन्यांनी यात सहभाग घेतला. त्यातही एक कंपनी अपात्र ठरली. गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंट, वाराणसी तसेच मुळा व मुठा नद्यांच्या सुशोभिकरणाचे काम करणारी एचसीपी कंपनी पात्र ठरली. त्यामुळे या कंपनीला बांधकाम विभागाकडून सादरीकरणासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या समितीसमोर सादरीकरण केले. त्यामुळे रामकाल पथच्या कामाला वेग येणार आहे.
सल्लागार नियुक्ती प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर सल्लागाराकडून राम काल पथ प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर मार्च २०२५ पूर्वी या कामासाठी संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्याचा प्रशासनाची प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.