

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
देवळाली रेल्वेस्थानकावर लवकरच दोन गाड्यांच्या थांब्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. भारतीय लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र, एअर फोर्सचे प्रमुख स्टेशन, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व नाशिक, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांतील गावासाठी मुख्य स्थानक असलेल्या रेल्वेस्थानकावर कोविडपूर्वी २२ गाड्यांना थांबा होता. परंतु सध्या येथे सातच गाड्या येथे थांबत असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सिंधी सेल प्रदेशाध्यक्ष रतन चावला व रिपाइंचे देवळाली कॅम्प शहर नेते सुरेश निकम यांनी केली होती. खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन गाड्यांना येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. देवळाली हे ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानक असून, येथे सर्वच गाड्यांना थांबा होता. लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र व साउथचे एअर फोर्स सेंटर असल्याने देशभरातील लष्करी अधिकारी, जवान व त्यांच्या परिवाराची ये-जा असते. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेले भगूर शहर हे अवघ्या दोन किलोमीटरवर असल्याने देशभरातून येथे सावरकरप्रेमी येतात. यासाठी सर्व गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी रिपाइं देवळाली कॅम्प शहर नेते सुरेश निकम यांनी सातत्याने केली होती. याशिवाय आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी चावला यानी केली होती.