

देवळाली कॅम्प : उत्तर महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगूर येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रंगरंगोटी तसेच मंदिर स्वच्छतेचे काम वेगात सुरू आहे. सुमारे 15 कलर शेड वापरून सलग चार दिवस राबून सुनील आहेरराव यांनी देवीच्या मूर्तीस सुशोभित केले आहे.
देवळाली कॅम्प भगूर मार्गावर रेस्ट कॅम्प रोड येथील भगूरच्या रेणुकामाता मंदिरात नवरात्राची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या दिवसांत येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट, पोलिस प्रशासन तयारीचा आढावा घेत असून, मंदिराचे मुख्य पुजारी दामोदर चिंगरे, वंदन चिंगरे हे नवरात्रातील नऊ दिवस पूजाविधी करणार आहेत.
नाशिक जिल्ह्याबरोबरच अन्य ठिकाणांहून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. गर्दीतही भाविकांची पैशाची पाकिटे, मौल्यवान दागिने, बॅगा, पर्स सुरक्षित राहाव्यात, यासाठी मंदिरातर्फे 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे. नऊ दिवस चालणार्या या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. देवळाली कॅम्पचे पोलिसही बंदोबस्ताचे तसेच पार्किंगचे नियोजन करण्यात व्यग्र आहे.