

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, देवळाली - दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेने शनिवार (दि. ५) आपली १०० वी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना त्यांची कृषी उत्पादने व इतर माल देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सेवा परवडणारी, विश्वासार्ह आणि सुलभ रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत आहे.
शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते १५ ऑक्टोबरला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला होता. ही रेल्वे दर शनिवारी साप्ताहिक स्वरूपात देवळाली ते दानापूरदरम्यान धावते. या रेल्वेत १० पार्सल व्हॅन आणि १० सामान्य श्रेणीचे डबे असून, प्रत्येक पार्सल व्हॅनची क्षमता २३ टन आहे.
आतापर्यंत या सेवेद्वारे एकूण १४,०७०.१० टन पार्सल मालाची वाहतूक करण्यात आली.
यामध्ये ५,४७२.५० टन नाशवंत वस्तू आणि ८,५९५.६१ टन हार्ड पार्सलचा समावेश आहे.
या कालावधीत पार्सल वाहतुकीतून सुमारे ५.१४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
४६,७२७ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून सुमारे १.२० कोटींचा प्रवासी महसूल मिळाला आहे.
रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब १,४८७.९२ टन, कांदा १,६५०.६९ टन, सीताफळ २५९.३५ टन, आले २०१.९१ टन, द्राक्षे १२९.८५ टन, लिंबू ११९.०६ टन, बिस्किट / चॉकलेट / कँडी ६,३५३.२४ टन, हग्गीज ५७४.४० टन, व्हीआयपी बॅग ४५६.९६ टन, प्लास्टिक बॅग ५६९.५३ टन, प्लास्टिक मॅट ५१९.८५ टन, कापड १९४.४८ टन, खाद्य उत्पादने १८७.५७ टन, औषधे ९२.६० टन यांच्यासह आइस्क्रीम, भेंडी, पानाची पाने, पेरू, शेवगा, कोथिंबीर, टरबूज, फुलकोबी, संत्री, आंबे, बीन्स, बोर, गाजर, मिश्र फळे, अंडी आदी नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यात आली.