

नाशिक : महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का? असा प्रश्न शिंदे गटाने महायुतीतील अजित पवार गटाला विचारलेला असताना देवळाली विधानसभा मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर डॉ. राजश्री अहिरराव लढण्यास सज्ज झाल्या आहेत.
देवळालीत शिंदे गटाने मंगळवारी (दि.5) मेळावा घेत राजश्री अहिरराव या शिंदे गटाच्या उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीच्या अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार डॉ. सरोज अहिरेंशी त्यांचा सामना रंगणार आहे. यामुळे महायुतीच्या दोन महिला उमेदवार देवळालीत आमनेसामने उभ्या ठाकल्याने देवळालीकरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
तहसिलदारपद भुषविलेल्या डॉ. राजश्री अहिरराव या देखील देवळालीतून निवडणूक लढविण्यात इच्छुक होत्या. दोन वर्षापुर्वी त्यांनी तहसिलदारपदाचा राजीनाम देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची राजकीय महत्वकांक्षा कायम असल्याने त्यांनी शरद पवार गटाकडूनही उमदेवारीसाठी प्रयत्न केले. याचवेळी नांदगाव विधानसभेच्या रिंगणात समीर भुजबळांनी प्रवेश केल्याने नांदगावचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे नाराज झाले.
शिंदे गटाने युतीधर्म आम्हीच पाळायचा का? असा प्रश्न विचारत फासे टाकण्यास सुरुवात केली. याचाच भाग म्हणून डॉ. राजश्री अहिरराव यांना शिंदे गटाने पक्षाचा एबी फॉर्म दिला. अर्ज दाखल करण्याच्या अंतिमदिनी राजश्री अहिराव यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला. अर्ज माघारीच्या अंतिम दिनी 4 नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास शिंदे गटाने निवडणूक शाखेत डॉ. राजश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करा म्हणून अर्ज दाखल केला. उमेदवारी रद्द करण्यास त्या स्वत: हजर नसल्याने त्यांना धनुष्यबाण चिन्हावर लढता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी स्पष्ट सांगितले. यामुळे डॉ. राजश्री अहिरराव यांचा उमदेवारी अर्ज वैध ठरला अन धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. राजश्री अहिरराव यांनी माध्यमांशी बोलताना वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखविला असून माझे काम बघून मला उमदेवारी दिल्याचे सांगितले. सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याने आता देवळालीत महायुतीच्या दोन महिला उमदेवार आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत.