

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारावरून निर्माण झालेला गुंता अद्यापही कायम आहे. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुक्रवारपर्यंत (दि.८) निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवघ्या मतदारसंघाच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रचाराचे वारे वाहायला सुरवात झाली आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या सरोज अहिरे दुसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. तर शिवसेनेने राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघात महायुतीच्या दोन उमेदवारांमुळे तिढा निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी सेनेच्या वरिष्ठांनी दोन दिवसांपूर्वी स्थानिक स्तरावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना व सूचनासंदर्भात पक्षाचे सचिव भाऊसाहेब चाैधरी यांनी मुख्यमंत्र्यांना अहवालही सादर केला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून अद्यापही या वादावर काेणताच निर्णय झालेला नाही.
शिवसेनेकडून निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अहिरराव यांना एबी फॉर्म देत चाल दिली गेली. त्यामुळे सरोज अहिरे यांची कोंडी झाली आहे. यासर्व वादामध्ये एकाच मतदार संघात महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. परिणामी, कोणत्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहायचे या विवंचनेत कार्यकर्ते सापडले आहेत.
देवळाली मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. याबाबतचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती पक्षाचे सचिव भाऊसाहेब चाैधरी यांनी दिली आहे.