

देवळाली कॅम्प (नाशिक) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सुशील मार्ग हा कागदोपत्री खुला असला तरी गेल्या चार वर्षापासून बंद आहे. लष्करी आस्थापनेकडून तो कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी प्रशासनाने सूचना प्रसिध्द केली आहे. बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी याला विरोध केला असून त्यांच्या विरोधाला बळकटी देण्यासाठी येत्या एक ऑगस्टपर्यतच्या मुदतीत अधिकाधिक देवळालीकरांनी हरकती नोंदविणे गरजेचे झाले आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंटमधील सुशील मार्ग हा रेल्वे स्थानक तसेच मिलिटरी हॉस्पिटल व कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडे जाणारा मार्ग आहे. तो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लष्करी आस्थापनेकडून कार्यवाही सुरू आहे. आजही कागदोपत्री खुले असलेले रस्ते कोविड काळापासून बंद केलेले आहेत. मार्च 2025 मध्ये या रस्त्यांना सिमेंटच्या भिंती उभ्या करून बंद केले जात आहे. सचिन ठाकरे यांनी 6 मे 2025 वा कॅन्टोन्मेंट प्रशासन व स्टेशन हेडकॉटर यांना लेखी पत्र देत कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार असे रस्ते बंद करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. ठाकरे यांनी सदर बाब खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे मांडली. खा. वाजे यांनी याबाबत संरक्षण मंत्रालयाला पत्र देऊन माहिती मागवली असता दिल्लीकडून देवळालीत याबाबत विचारणा झाली. कायदेशीर प्रक्रिया न करताच अशा प्रकारचे रस्ते बंद करणे उचित नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक लष्करी प्रशासनाने हरकतींची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्ते हे जनतेसाठी खुले असावेत, याबाबत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी 2017 पासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे काही रस्ते माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी खुले ठेवण्याबाबत स्थानिक लष्करी आस्थापना व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना सुचित केले होते.
ठाकरे यांनी कॅन्टोन्मेंट कायदा व त्यामधील अधिनियम 258 नुसार जनतेच्या हरकती विचारात घेतल्याशिवाय रस्ते बंद करणे गैर ठरते, हे वास्तव्य प्रशासन व जनतेसमोर मांडले आहे. यापूर्वी लष्करी आस्थापनाने येथील गोस्वामी मार्ग अशाच प्रकारे बंद केलेला आहे. वास्तविक त्यासाठी लष्कराचे जिओसिची परवानगी क्रमप्राप्त होते. मात्र ती घेतलेली नाही. बोर्डात 2021 पासून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लष्करी आस्थापनाकडून नागरिकांच्या विचाराला तिलांजली दिली जात आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी 2020 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून देवळालीतील सुशील मार्ग, गोस्वामी मार्ग, महेंद्रसिंग मार्गासह इतरही रस्ते सुरू ठेवण्याबाबत लेखी पत्र दिलेले होते. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी बोर्डाच्या सभेत चर्चेशिवाय कोणतेही रस्ते बंद करू नये, असे आदेश दिलेले आहेत.
खासदार राजाभाऊ वाजे यांनीही याबाबत माहिती घेत कॅन्टोन्मेंट प्रशासनाशी चर्चा केलेली आहे. तसेच याबाबत त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे हरकत नोंदविताना नागरिकांची अडचण होईल, असे कोणतेही रस्ते बंद करू नयेत, अशा सूचना देखील केलेल्या आहेत.
कॅन्टोन्मेंट कायद्यातील कलम 258 नुसार बोर्ड हद्दीतील कोणताही रस्ता बोर्डातील चर्चा व जनतेच्या हरकतीनंतरच बंद केला जाऊ शकतो. स्थानिक लष्करी आस्थापना वेगळी भूमिका घेत असेल तर ती मान्य केली जाणार नाही. देवळालीतील नागरिकांना या रस्त्यांची गरज असल्याने त्यांच्या संमतीशिवाय कोणताही रस्ता बंद करू नये.
सचिन ठाकरे, नामनिर्देशित सदस्य कॅन्टोन्मेंट बोर्ड
लष्करी प्रशासनाने सप्लाय डेपोजवळील गोस्वामी मार्गही अशाच प्रकारे बंद केला आहे. मागील वर्षी या रस्त्याला बोर्डात परवानगी दिली असली तरी जिओसी कार्यालयाची अद्याप अंतिम मंजुरी आलेली नाही. तरीदेखील हा मार्ग बंद करण्यात आला.