

देवळा : देवळा शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे ( विंचूर प्रकाशा ) काम सुमारे दिड ते दोन वर्षापासुन अतिशय संथ गतिने सुरू आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून ,सदर काम जलद गतीने व्हावे अशी मागणी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की ,सध्या देवळा शहरात रस्त्याचे काम चालु असुन, ठिकठिकाणी रस्त्यावर खोदकाम केलेले असल्याने, पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होवुन दररोज वाहतुक कोडी होत आहे. यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाणात वाढत असल्याने पोलीस ठाण्यात प्रवासी व नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच नंदुबार, साक्री, पिंपळनेर सटाणा येथुन येणा-या रुग्णवाहीका देवळा मार्गे नाशिक येथे रुग्नांना औषध उपचारासाठी घेवुन जात असतात, एखाद्या वेळेस सदर वाहतुक कोंडी मुळे रुग्णवाहीकेस रुग्णास औषध उपचार कामी घेवुन जाण्यास उशीर होवुन रुग्ण दगावल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे देवळा ते सटाणा रोड वर मोठमोठे महाविद्यालय, शाळा असल्यामुळे दररोज हजारो विद्यार्थी / विद्यार्थीनी जिवमुठीत घेवुन प्रवास करत आहेत.
यादरम्यान काही घटना घडल्यास किंवा अपघात घडल्यास कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील. देवळा पोलीस स्टेशन कडील 01 पोलीस अंमलदार व नवरात्रोत्सव काळात बंदोबस्ताकामी आलेले होमगार्ड कर्मचारी पैकी रोज 8 ते 10 होमगार्ड यांना वाहतुक सुरळीत करण्यासाठी नेमलेले आहे. परंतु दि ३ सप्टेंबर रोजी त्यांचा बंदोबस्त मोकळीक होत असल्याने ते वाहतुक नियमन करण्यासाठी उपलब्ध राहणार नाही. तसेच देवळा पोलीस स्टेशन कडेस पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, तसेच आगामी सण-उत्सव काळात वाहतुक नियमनासाठी जास्त कर्मचारी नेमणे अशक्य असल्याने आपल्या विभागामार्फत सदर महामार्गाचे काम घेतलेले ठेकेदाराला वाहतुक सुरळीत करण्यासाठी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरुन वाहतुकीस सुरळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
तसेच देवळा शहरात महामार्गाचे कुर्मगतीने चालु असलेले काम जलद गतीने व्हावे. व रस्त्याच्या कामामुळे होणा-या धुळीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही. याची तात्काळ दखल घेऊन महामार्गाचे काम जलद गतीने करण्यात यावे अशी मागणी। शहरवासीयांची केली आहे.