

देवळा: शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या (NH752-G) रुंदीकरणाच्या कामात जाणिवपूर्वक अनियमितता केली जात असल्याचा आरोप करत, महामार्गाची रुंदी २६ ते ३० मीटर करण्याच्या आणि ऐतिहासिक पाचकंदील वास्तू जैसे-थे ठेवण्याच्या मागणीसाठी सोमवार, दि. १५ पासून राव मंडळाचे स्वप्नील आहेर देवळा नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
या संदर्भात उपोषणकर्ते स्वप्नील आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी (NH752-G) हा गुंजाळनगर परिसरामध्ये ४-पदरी म्हणजेच २६.०० मीटर रुंदीचा आहे. मात्र, देवळा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
आहेर यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभाग काही विशिष्ट व्यक्तींच्या दबावाखाली येऊन काम करत आहे. जागा उपलब्ध असूनही मनमानी पद्धतीने रुंदी कमी केली जात आहे, ज्यामुळे देवळा शहर आणि प्रवाशांवर अन्याय होत आहे. शहराचा वाढता विस्तार, महामार्गालगत असलेल्या शाळा-महाविद्यालये आणि वाढती वाहतूक या सर्व बाबींचा विचार करून शहरातून जाणारा महामार्ग नियमानुसार ४-पदरी, दुभाजक, सर्व्हिस रोड आणि फुटपाथसह करणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महामार्गाची रुंदी कमी करून शहराचा मानबिंदू मानला जाणारा ऐतिहासिक पाचकंदील आणि मुंजोबा पारची भिंत पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. "ही मंडळी कोणाच्या जीवावर हे धाडस करत आहेत, हे समजत नाही," असे आहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
देवळा नगरपंचायतीची भूमिकाही संशयास्पद वाटत असून, त्यांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक अतिक्रमित टपऱ्या काढून रस्ता रुंदीकरणासाठी मदत करावी, अशी मागणी आहे. "प्राण गेला तरी चालेल, पण भविष्यात होणारे मोठे अपघात टाळण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि तसे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही," असा ठाम निर्धार आहेर यांनी व्यक्त केला आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी मुख्य अभियंता प्रादेशिक अधिकारी (राष्ट्रीय महामार्ग विभाग, मुंबई), तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही दिली आहे. यामुळे देवळा शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.