Nashik : सारं काही डेंग्यू निर्मूलनासाठी! शहरात आता ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी

डेंग्यू निर्मूलन: पालकमंत्र्यांनी कान टाचले, प्रशासन खडबडून जागे झाले
डेंग्यू
शहर परिसरात डेंग्यू निर्मूलनासाठी ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी केली जात आहे. pudhari news network

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांनी कान टोचल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, कोरोनाच्या धर्तीवर डेंग्यू निर्मूलनासाठी ट्रॅक्टर्सद्वारे शहरात कीटकनाशकाची फवारणीचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. पेस्ट कंट्रोल प्रभावीपणे होण्यासाठी जंतुनाशक व धूर फवारणीकरिता तीन महिन्यांसाठी अतिरिक्त २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती केली जाणार आहे.

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डेंग्यूबाधितांचा आकडा पाचशेच्या वर पोहोचल्याचे वैद्यकीय विभाग सांगत असले तरी प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने डेंग्यूचे रुग्ण असण्याची शक्यता आहे. डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या गर्दीने खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. त्यातच जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत डेंग्यू चाचण्यांचे किट संपुष्टात आल्याने चाचण्या खोळंबल्याच्या प्रकाराने शहरभर संतापाची लाट पसरली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांनी शनिवारी (दि.२०) रोजी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची संदर्भ सेवा रुग्णालयात तातडीची बैठक घेत डेंग्यू नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दल अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. डेंग्यू नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅक्टर्सद्वारे धूर व जंतूनाशक फवारणी, जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या वैद्यकीय विभागाने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी व धुर‌ळणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ठेकेदाराच्या सहा वाहनांद्वारे धुरळणी केली जात आहे. त्या सोबतच आता प्रत्येक विभागात दोन ते तीन अतिरिक्त ट्रॅक्ट्रर वाढवून कोरोनाच्या धर्तीवर कीटकनाशक फवारणी व धुरळणी केली जाणार आहे. त्यासाठी जवळपास २० ट्रॅक्टर्स भाड्याने घेतले जाणार आहेत. तर सहा विभागांसाठी ठेकेदाराला तीन महिन्यांसाठी २५० कर्मचारीवर्ग वाढण्यासह औषधसाठा व डिझेल पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

'वॉक फॉर डेंग्यू'

डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून 'वॉक फॉर डेंग्यू' हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या उपक्रमात महापालिका तसेच शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमांतर्गत डेंग्यूबाबत जनजागृती तसेच डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच शनिवार व रविवारी असे दोन दिवस नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

डेंग्यू
Nashik Alert | डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिका फ्रंटफूटवर

प्रयोगशाळेतील चाचण्या सुरू

चाचणी किटअभावी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत डेंग्यू चाचण्या ठप्प झाल्या होत्या. याबाबत पालकमंत्री भुसे यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत किट प्राप्त झाले असून, चाचण्यांना सुरुवात झाली आहे. महापालिकेचे जवळपास अडीचशे अहवाल जिल्हा रुग्णायालयाकडे प्रलंबित होते. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा वाढणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या सूचनांनुसार डेंग्यूच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. डास निर्मूलनासाठी कीटकनाशक, धूरफवारणी वाढविण्यासह जनजागृतीसाठी वॉक फॉर डेंग्यू, 'कोरडा दिवस' पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news