

देवळाली कॅम्प (नाशिक) : देशभरात वाढलेल्या सुरक्षा सज्जतेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवासी, रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वेची महत्त्वाची साधनसंपत्ती सुरक्षित राहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे. विभागात सर्वच स्टेशन व कार्यक्षेत्रांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे.
भुसावळ विभाग स्थानिक पोलिस प्रशासन व गुप्तचर यंत्रणांशी सतत संपर्क ठेवून माहितीचे आदानप्रदान अधिक जलद करण्यावर भर देण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच कुठलीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू दिसल्यास तत्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानकावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवून २४ तास निरीक्षण केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बल, (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि वाणिज्य विभागातील कर्मचारी यांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय मुख्य स्टेशनवर श्वासन पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म, यार्ड, सर्क्युलेटिंग क्षेत्र तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची ग्रस्त वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोध पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
प्रवाशांमध्ये जनजागृती
प्रवाशांना सतर्क राहण्यासाठी उदघोषणा व जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. संवेदनशील ठिकाणी प्रवेश नियंत्रण कडक करण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगतरीत्या पाहणी केली जात आहे.